मध्यावधी निवडणूक ही फक्त अफवाच; आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता – शरद पवार

12 May 2017 , 09:55:09 PM


पक्ष संघटनेने दोन्ही निवडणुकांची तयारी करावी -
लवकरच महाराष्ट्र दौरा करणार - शरद पवार

मध्यावधी निवडणुका लागतील ही केवळ अफवा आहे. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होऊ शकतील अशी शक्यता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली. भारतात सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासनावर बराच ताण येत असतो. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा मनमोहन सिंग यांच्याही काळात झाली होती. आताच्या सरकारमध्येही अशाच प्रकारची चर्चा चालू आहे. त्यामुळे पक्ष संघटनेने आतापासूनच दोन्ही निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आज, गुरुवार, ११ मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बैठक पार पडली. बैठकीला पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, निरीक्षक, प्रभारी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रचारावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीचे आश्वासन तेथील शेतकऱ्यांना दिले होते. निकालानंतर त्यांनी कर्जामाफीची घोषणाही केली मग हीच घोषणा इतर राज्यात का केली नाही? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधकांनी संघर्षयात्रा काढली. सरकारतर्फे आता संघर्षयात्रेला उत्तर देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. यातच संघर्षयात्रेचे यश आहे. विरोधकांनी काढलेल्या यात्रेचा धसका सरकारने घेतला. याच पद्धतीने पक्षाने लोकांमध्ये राहून संघर्ष करण्याची मानसिकता बनवली तरच आपल्याला यश मिळू शकेल. कवी सुरेश भट यांच्या उषःकाल होता होता... या कवितेतील ओळींची आठवण करुन देत, आता आपल्यालाही कात टाकावी लागेल, असे परखड मत यावेळी पवार साहेबांनी व्यक्त केले.

शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र अव्वल
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका खटल्याच्या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मागितली होती. या आकडेवारीतून शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचे समोर आले आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणले. महाराष्ट्रानंतर या आकडेवारीत तेलगंणा, आंध्रप्रदेश आणि त्यानंतर कर्नाटकाचा क्रमांक लागतो.

संबंधित लेख