युती सरकारने तीन वर्षांत केले तरी काय? विरोधी पक्षांचा सरकारला जळजळीत सवाल...

19 May 2017 , 10:35:16 PM

सिंधुदुर्ग येथे संघर्षयात्रेचा समारोप...
चंद्रपूर जिल्ह्यापासून शेतकर्यां च्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे बांद्याजवळील सावंतवाडीत जाहीर सभेद्वारे समारोप झाला. काल रायगड येथून सुरु झालेला संघर्षयात्रेचा शेवटचा टप्पा रत्नागिरी व सिंधुदुर्ग असा प्रवास करत संपुष्टात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विरोधकांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर कडाडून टीका केली.
कोकणातील मुख्य पीक भात आहे. वाजपेयी सरकारच्या काळात भाताच्या पिकाला कमी दर दिले जात होते पण सत्ता परिवर्तन झालं, धर्मनिरपेक्ष मताचे सरकार आले आणि पवार साहेबांनी भाताच्या पिकाला दर वाढवून दिले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले. या युती सरकारला सवाल आहे की यांनी तीन वर्ष काय केलं? भात उत्पादक शेतकऱ्यांना कितीचा बोनस दिला? किती पीक खरेदी केलं, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तूर डाळ उत्पादक शेतकरी आज उद्ध्वस्त होत आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे, असेही ते म्हणाले. कोकणातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात, याकडे लक्ष वेधत कोकण प्रांतात शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी काय प्रयत्न केले, असेही त्यांनी विचारले.
तर, कोकणातील भाताला, आंब्याला भाव नाही, इथला मत्स्यव्यवसाय उद्ध्वस्त होतोय. आघाडीच्या काळात आम्ही कोकणाच्या मदतीला धावायचो. आज भाजप-शिवसेनेवाले काय करतायत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला विचारला. ५६ इंचाची छाती असलेलं सरकार जवानांच्या मृतदेहांची विटंबना झाली, सैनिकांच्या पत्नींनी आंदोलन केले तरी लक्ष देत नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी सरकारवर टीका केली. 
शिवसेनेचे मंत्री म्हणतात राज्यात भ्रष्टाचार होत आहे. शिवसेना-भाजपचं नाटक आता आपण बंद केलं पाहिजे. एक मारल्यासारखं करतो दुसरा रडल्यासारखं करतो. दानवे स्टेजवर शिवराळ भाषा वापरतात तर आतून शेतकऱ्यांना किती शिव्या घालत असतील, याने स्पष्ट होतं की हे भाजपचे लोक कसे मस्तवाल झाले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. संघर्षयात्रेचा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहिल, असे आश्वासन विरोधी पक्षांच्या सदस्यांनी दिले.  
यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे, रिपब्लिकन पार्टी - कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे, आ. राजेश टोपे, विक्रम काळे, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, प्रकाश गजभिये, नितेश राणे, किरण पावसकर व विरोधीपक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख