शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष संपणार नाही - सुनिल तटकरे

20 May 2017 , 06:55:04 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे समारोप होणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरी येथे विरोधकांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे सरकार आल्यापासून कोकणातील भात शेती उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे व काजू, आंब्यासारख्या महत्त्वाच्या पिकांकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून दरवर्षी ४००-५०० प्रवाश्यांचा नाहक बळी पळस्पे ते इंदापूर रस्त्याच्या दुर्दशेमुळे जातो, असेही ते म्हणाले. एकीकडे टोल रद्द करण्याच्या घोषणा करत हे सरकार सत्तेवर आले, पण आता चौपदरीकरणानंतर महामार्गावर टोल आकारला जाणार असल्याचे गिते यांनी आधीच सांगून टाकले आहे. हा टोल भरणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून या टोलला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघर्षयात्रा आज संपत असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी, किमान आधारभूत किंमत वाढवून त्यानुसार खरेदी व खरीपासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, तोवर संघर्ष सुरू राहणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याठिकाणी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. शिवसेनेचं काय सुरू आहे हेच कळत नाही. सत्ताधारी पक्षांनी निर्णय घ्यायचे असतात, मात्र हेच आंदोलन करत फिरतात. कॅबिनेट बैठकीत काजू, बदाम खायचे आणि नंतर बाहेर येऊन म्हणायचं आम्हाला निर्णय समजला नाही, ही अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असे ते म्हणाले. भाजप-शिवसेनेचे युती सरकार बेजबाबदार असून भाजपमध्ये गुंडांचं राज्य सुरु आहे तर शिवसेनेचं शेतकरी प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून आधी तूर लावायला सांगितलं आणि आता पाठ फिरवत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ. योग्य वेळ काय पंचांगामध्ये बघून ठरवणार, असा प्रश्नही त्यांनी राज्य सरकारला विचारला. तसेच, शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असे आवाहन करताना संपावर गेलात तरी हे दळभद्री सरकार तुम्हाला न्याय देणार नाही, असे ते म्हणाले.

संघर्षयात्रेनंतर राज्यात गोंदिया, नांदेड, चंद्रपूर अशा तीन ठिकाणी विरोधीपक्षांतर्फे मोठया सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, रिपब्लिकन पक्ष - कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे, सुनील केदार व विरोधीपक्षातील अन्य आमदार उपस्थित होते.

संबंधित लेख