येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर घडणार बदल - सुनिल तटकरे

29 May 2017 , 10:17:53 PM

सरकारच्या अपयशाची तीन वर्षे पूर्ण
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे येत्या १० जूनपासून करणार राज्यव्यापी दौरा

मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या नाकर्त्या तीन वर्षांचा त्यांनी यावेळी उहापोह केला.

गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार देशात कार्यरत आहे. या कालावधीचे जर आपण विश्लेषण केले तर ज्याने देशात बदल घडेल, देशाच्या विकासाला गती मिळेल असा कोणताच ठोस निर्णय यांनी घेतलेला नाही. मागील युपीए सरकारने जे निर्णय घेतले त्याच निर्णयांवर हे सरकार सुरू आहे. जीएसटी विधेयक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. युपीए सरकारने ज्या योजना आखल्या त्या योजनांची नावं बदलून हे सरकार त्याच योजना राबवत आहे. म्हणजे योजना तीच, फक्त लेबल बदललं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे हे सरकार गेल्या तीन वर्षांत अपयशी ठरले आहे. राज्यातील सरकारचंही काही वेगळं सुरू नाही. राज्यातील सरकारमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही, डोक्यावर भरमसाठ कर्जाचं डोंगर वाढत आहे. परिणामी त्याला आत्महत्या करणं जास्त योग्य वाटत आहे. या सरकारच्या चुका जनतेसमोर मांडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्षयात्रा काढली. आमच्या संघर्षयात्रेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी आघाडी सरकारच्या काळात रोज आंदोलन करत होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. राजू शेट्टी त्याबाबत बोलायला तयार नाहीत. आम्ही संघर्षयात्रा काढल्यानंतर त्यांना जाग आली आणि आता ते आत्मक्लेश यात्रा काढत आहेत. शेट्टी यांना शेतकऱ्यांशी देणे-घेणे नाही, असा आरोप तटकरे यांनी केलाय

राज्याच्या सत्तेत ज्यांचा वाटा आहे त्या शिवसेनेचीही तीच गत आहे.सार्वजनिक कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊ नये, तसे केल्यास त्यांची पदे रद्द करण्यात येतील, असा इशारा कर्नाटकचे मंत्री बेग यांनी दिला होता. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तेथील मराठी जनतेने काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते बेळगावला जाणार होते पण त्यांना पोलिसांनी रोखले. शिवसेनेचा वाघ मवाळ झाला आहे. बेळगावमधील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणे ही रावते यांची ‘राजकीय नौटंकी’ होती. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून जायला हवे होते, असेही ते म्हणाले.

तसेच, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर काही बदल करण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी येत्या १० जूनपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे तरुणांचा ओढा अधिक आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्याही समस्या जाणून घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करणे, हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख