विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये – शरद पवार

01 Jun 2017 , 10:23:20 PM

समृद्धी महामार्गाबाबत १२ जून रोजी राज्यस्तरीय बैठक

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. याबाबत थेट प्रकल्पबाधितांशी थेट चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बोलावली होती. यावेळी शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर आपल्या विविध अडचणी बोलवून दाखवल्या. दरम्यान येत्या १२ जून रोजी औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाबाबत राज्यस्तरीय परिषद घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या राज्यस्तरीय बैठकीचं नेतृत्व शरद पवार करणार असून या बैठकीत समृद्ध महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी, विविध संघर्ष समित्या सहभाग घेणार आहेत.

या बैठकीला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधासाठी विरोध कधीच करणार नाही तशी आमची भूमिकाही नाही. आदिवासी भागातील जमिनी संपादित करायच्या असतील तर पेसा कायद्याप्रमाणे तिथल्या ग्रामपंचायतीचा परवानगी घेणे आवश्यक असते पण सरकारतर्फे या तरतुदींची पुर्तता झालेली दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांची समंती नसताना त्यांच्या जमिनीची मोजणी केली गेली. ज्या लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला जात आहे असे तेथील लोक सांगत आहेत. सरकार प्रकल्पग्रस्तांना किती मोबदला देणार याबाबतही सरकारने खुलासा केला नाही असेही पवार म्हणाले. समृद्धी महामार्गाबाबत सरकारने केलेले सादरीकरण अपुरं दिसत आहे अशी खंत शेवटी पवार यांनी व्यक्त केली.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरा, पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी आणि प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.⁠

संबंधित लेख