देशातील राजकारण वाईट वळणावर! - शरद पवार

13 Jun 2017 , 09:16:37 PM

शरद पवार यांची भाजपवर टीका; रोजगार निर्मितीत सरकारला अपयश

काही संघटनांना हाताशी धरून सत्तारूढ भाजप देशातील वातावरण कलुषित करत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते देशातील राजकारण सध्या वाईट वळणावर गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी केली.

पक्षाच्या एकोणिसाव्या स्थापना दिनानिमित्त येथील मावळणकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्या वेळी पवारांनी केलेले भाषण हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उद्रेक, मंदसौरचा गोळीबार, महाराष्ट्रातील संप आणि संघपरिवारातील संघटनांवर केंद्रित होते. शेतीमालाला उत्पादनाच्या खर्चापेक्षा पन्नास टक्के अधिक भाव देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. तीन वर्षे झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल करून ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा सध्या उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. पीकविम्यासाठी सुमारे सोळा हजार कोटींचा प्रीमियम भरला, पण शेतकऱ्यांना मिळालेली नुकसानभरपाई फक्त सात हजार कोटी रुपयांची आहे. म्हणजे विमा कंपन्यांचे घर सरकार भरत आहे. गव्हाचे उत्पादन भरघोस होणार असतानाही आयात शुल्क हटविले, तर डाळिबांचे घसघशीत उत्पादन येणार असतानाही निर्यातबंदी वेळेवर उठविली नाही. तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी केलेल्या मोठ्या आंदोलनाकडे मोदी सरकारने ढुंकूनही लक्ष दिले नाही.’

पंतप्रधान मोदींवरही पवारांनी कडाडून टीका केली. ‘मोदी परदेशात मोठमोठी भाषणे देतात, परदेशात भारताची मान उंचावल्याचा दावा करतात, पण त्याअगोदर संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल पहा. अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात मोदींना अपयश आल्याचा ठपका त्यात आहे. सक्तीने धर्मातर होत असल्याचे प्रतिपादन त्यात आहे. रोजगारनिर्मितीमध्ये तर सरकारला ठोस अपयश आले आहे. दोन वर्षांत फक्त तीन लाख रोजगार निर्माण झाले. याउलट डॉ. मनमोहन सिंग सरकारने एकट्या २००९ मध्ये १० लाख रोजगार निर्माण केले होते,’ असे ते म्हणाले.

संबंधित लेख