सेनेचा सत्तेचा मोह सुटत नाही त्यामुळे मध्यावधीची शक्यता नाही – सुनिल तटकरे

20 Jun 2017 , 07:32:21 PM

मराठवाडा दौऱ्याच्या सहाव्या दिवशी आज लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या बैठका झाल्या. कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यादरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षांनी १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. या कटात सहभागी असलेल्या व्यक्तींना न्यायालयाने आज दोषी करार दिलाय. निर्णयाला उशीर झाला असला तरी या देशातील न्यायालयीन व्यवस्था किती प्रग्लभ आहे त्याचं चित्र या निर्णयाच्या माध्यमातून दिसतं असे वक्तव्य तटकरे यांनी केले. या सर्वांना फाशीची शिक्षा होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पुढे कोणाच्याही मनात असं अतिरेकी काम करण्याचं धाडस होऊ नये यासाठी न्यायालयाने जरब बसवावी. तपास यंत्रणेचं आणि न्यायालयाचं त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. शिवसेना फक्त वल्गना करते. भाजपने जेव्हा सरकार स्थापन केले, त्यावेळी सेना विरोधी पक्षात बसून एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा सरकार विरोध भूमिका घेतली. आता सत्तेत सामील असताना भाजपबरोबर आतमध्ये मांडीला मांडी लावून बसायचे, बाहेर सरकारचा विरोध करायचा याला काय अर्थ? असा आरोप त्यांनी यावेळी केला. सेनेचे मंत्री सतत राजीनामा देण्याची धमकी देतात. पण यांच्याकडून काही सत्तेचा मोह सुटत नाही. सेनेचे मंत्री काही राजीनामा देत नाही. त्यामुळे मध्यावधीची निवडणुकांची कोणतीच शक्यता दिसत नसल्याचे ते म्हणाले. तरीही तशी परिस्थिती आल्यास राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी अजित पवार मध्यावधी निवडणुकांवर भाष्य करताना म्हणाले की मध्यावधी निवडणुका होईल की नाही ते सांगायला आम्ही काही ज्योतिष नाही. हे (शिवसेना) कसले सोडतायत सत्ता... एकदा गुळाच्या ढेपीला मुंगळा चिकटला तर तो कसला सोडतोय. शिवसेनेची सध्याची परिस्थिती म़ुंगळ्याप्रमाणेच आहे.⁠⁠, असे ते म्हणाले.

संबंधित लेख