सुनिल तटकरे व अजित पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी साधला संवाद

03 Jul 2017 , 08:42:04 PM

कोल्हापूर विभागीय संघटनात्मक दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

अडीच वर्षांपेक्षा जास्तीचा काळ उलटला आहे तरी सेना-भाजपच्या सरकारने ठोस असे काही निर्णय घेतले नाही किंबहुना वेळोवेळी यांनी राज्यातील जनतेविरोधात धोरणं आणली. या गोष्टींचा विरोध करण्यासाठी एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही दौरा काढला आहे. या दौऱ्यादरम्यान संघटनेच्या कामांचा तसेच कार्यकारिणीचा आढावा व माहिती घेणे सुरू आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. सरकारने कर्जमाफी केली असली तरी अजूनही शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ग्रामस्तर ते राज्यस्तरापर्यंत वर्षभर आंदोलने राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत अशी परिस्थिती सध्या तरी दिसते. पण ज्यावेळी निवडणुका होतील तेव्हा पूर्णपणे ताकदीनिशी आम्ही लढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आजच्या बैठकीत प्रचंड आशावादी सूर दिसला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांच्यात दिसून येत आहे, याबाबत अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी बजेटमध्येच सरकारने तरतूद करावी. या सरकारने कर्जमाफी केली मात्र त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहेत. गरजू शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात आम्ही पुन्हा हा मुद्दा लावून धरणारे, असेही ते यावेळी म्हणाले. आपला हा दौरा निवडणुकांसाठी नाही, ही मध्यावधीची तयारी नाही. संघटना मजबूतीकरणासाठी हा दौरा आहे. एकोपा दाखविण्यासाठी, पक्षात शिस्त लावण्यासाठी यापुढे कडक पाऊले उचलणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख