सुनिल तटकरे व अजित पवार यांच्या राज्य दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यास रत्नागिरीपासून सुरूवात

04 Jul 2017 , 06:19:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज रत्नागिरी येथे झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे तसेच मागचे विसरुन नव्या जोमाने पुढील तयारीला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यात बलात्कार, विनयभंग, महिलांवरील अत्याचार अशा घटनांमध्ये सरसपणे वाढ होत आहे पण सरकार काहीच करताना दिसत नाही, असा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा. सरकार फक्त बेटी बचाव बेटी पढाओ अशा घोषणा देत आहे त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. कर्जमाफी केली पण त्याआधी मोठमोठे बॅनर लावून सरकारने शेतकऱ्यांची क्रुर थट्टा केली, असेही त्या म्हणाल्या. आज बचत गटांना काम नाही, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने करायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सत्तेपोटी अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसचे घर सोडून गेले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरण्याची गरज आहे. आता पुन्हा आपल्याला पवार साहेबांच्या विचारांची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनाधार वाढवण्याची गरज आहे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी येथे बोलताना केले. शिवसेनेकडे काही नसताना फक्त भावनिक मुद्द्यांच्या जोरावर पक्ष संघटना मजबूत करत आहे. आपल्याकडे तर पवार साहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व आहे, मग आपण मागे का रहायचं, असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, संजय कदम, जयदेव गायकवाड, ग्रंथालय सेलचे शिवाजीराव पाटील, प्रमोद हिंदुराव, रत्नागिरी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख