संघर्ष करण्यासाठी परवानगीची गरजेचे नाही, चूक वाटले तेथे विरोध करा - जयंत पाटील

05 Jul 2017 , 06:43:52 PM

सांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला गायीची किंमत आहे मात्र आईची किंमत नाही, अशी टीका केली. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचाराच्या घटना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहे. मंत्र्यांचे पी.ए महिलांचे विनयभंग करतात. ज्या मंत्रालयातून राज्याच्या विकासाबाबत हालचाली होतात तिथेच महिला सुरक्षित नाहीत, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. सॅनिटरी पॅड्स जीएसटीतून वगळावा अशी मागणी महिला करत आहेत मात्र सरकार त्याची दखल घेत नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तर विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात काढलेल्या संघर्षयात्रेनंतर शेतकऱ्यांचा लढा सुरू झाला व त्यांनी संपाचे अस्त्र उगारले, असे सांगितले. शेतकऱ्यांच्या संपाला घाबरून सरकारला कर्जमाफी द्यावीच लागली. आपण संघर्ष केला म्हणून ही कर्जमाफी मिळाली. संघर्ष करण्यासाठी कोणाची परवानगी घेणे गरजेचे नाही तिथे चूक वाटले तेथे विरोध करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष ग्रामीण विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष शहर संजय बजाज, आमदार सुमन पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आ. स्मिता पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आ. जयदेव गायकवाड व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख