दादा आमची घरं वाचवा...पिंपरी-चिंचवडच्या रहिवाश्यांची अजित पवार यांना साद

07 Jul 2017 , 06:12:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौर्या्निमित्त प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या जिल्हावार कार्यकर्ता मेळावे, बैठका आयोजित केल्या जात आहेत. यानिमित्ताने अजितदादा बऱ्याच दिवसांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले होते. या शहरासाठी खूप काही कामं करूनही जनतेने त्यांच्या विरोधात निकाल टाकला होता. त्यामुळे दादा आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पिंपरी-चिंचवड येथील मेळाव्यास्थळी अजितदादांचं आगमन झालं. तसे काही नागरिकांनी 'दादा आमची घरं वाचवा...' अशी साद घालणारे बॅनर झळकावले. या नागरिकांमध्ये वयोवृद्ध, तरुण, महिला, लहान मुलांचा समावेश होता. आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी ते आले होते.

महानगरपालिकाद्वारे शहरात रिंग रोड बनवण्याचा घाट घातला जात आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांची घरं नेस्तनाबूत केली जाणार आहेत. त्यांच्या घरासमोर बुलडोझर उभा असून ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर व्हावं लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत या लोकांना कोणीच साथ द्यायला तयार नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ते अजितदादांकडे आले होते.

अजितदादांनी त्यांची व्यथा ऐकताच कोणताही विचार न करता आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, "हे चालणार नाही, पालिकेला याबाबत विचार करावाच लागेल", असे सुनावले. आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहात हा विषय मांडून सरकारला नागरिकांच्या बाजूने निर्णय घ्यायला भाग पाडू, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे.

संबंधित लेख