चार महिन्यांत पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी प्रशासनाने काय केले? – अजित पवार

07 Jul 2017 , 07:22:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई महानगरपालिकोतील हाणामारीच्या प्रकरणावर बोलताना भाजप शिवसेनेचा नौटंकीपणा सुरू आहे, असे वक्तव्य तटकरे यांनी केले. काल जे महापालिकेत घडले त्याने स्पष्ट झालं की यांच्या मनात एकमेकांबाबत किती आदर आहे. देशाचा प्रमुखाला चोर म्हटलं जात हे अशोभनीय आहे. दोघांचं दुटप्पीपणाचं राजकारण सुरु आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबाबत सुरुवातीपासून अपप्रचार केला जात आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी काही नवीन नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे जनता उभी आहे हे आजच्या मेळाव्यात जमलेल्या गर्दीतून स्पष्ट झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी चार महिन्यात पिंपरी चिंचवड मध्ये भाजप प्रशासनाने काहीच केलं नाही, यावर खेद व्यक्त केला. यांच्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्या आहेत. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हे लोक प्रयत्न करतात. कोणत्याच कामा यांना गती देता येत नाही. पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही. शहरांची लोकसंख्या वाढतच असते, याची काळजी घेत सर्व नियोजन केलं पाहिजे. पण तसं पिंपरी चिंचवडमध्ये होताना काही दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. मतदारांनी फक्त कमळाचं बटन दाबलं. लोकांना माहीत नाही त्यांचा नगरसेवक कोण आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे पण एवढा विकास करून पण पराभव मिळत असेल तर विकास करताना विकास करणारे विचार करतील. पिंपरी चिंचवडच्या पराभवाची जबाबदारी माझी आहे मी केलेली कामे लोकांना सांगण्यास अपयशी ठरलो, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख