येत्या काळात आपल्याला संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे – दिलीप वळसे पाटील

12 Jul 2017 , 06:05:01 PM

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर येथे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, शिवसेनेचे नेते संभाजी राळेभात, भारत चव्हाण मनोज खोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

२०१४ मध्ये एक लाट आली आणि त्यात लोकांनी कोणालाही निवडून दिलं. तेच विधानसभेत घडलं. मात्र लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आपल्याला हे बदलायचं आहे त्यामुळे पक्षाने नव्याने सुरुवात केली आहे. येत्या काळात आपल्याला संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे. येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली ताकद कशी वाढेल त्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. तर, आ. मधुकर पिचड यांनी विरोधकांनी संघर्षयात्रा काढल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाहीतर तर यांनी कर्जमाफी केली नसती, असे वक्तव्य केले. हे लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतात पण कृती काही करत नाहीत. देशात हिटलरशाही येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

तसेच, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर आता मोठी जबाबदारी आली आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीये. याचा विरोध महिला कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहन महिला कार्यकर्त्यांना केले.

तर, अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिशी युवकांची आणि विद्यार्थ्यांची ताकद उभी करू, गाव तिथं युवकांची शाखा आणि घर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा अशा उपक्रम राज्यभर राबवू, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. भाजपचे लोक शिवराळ भाषेचा उपयोग करत आहेत. यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

या मेळाव्यात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अहमदनगर निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहाराध्यक्ष माणिकराव विधाते, आ. जयदेव गायकवाड, आ. स्मिता पाटील, आमदार राहुल जगताप,आ. वैभव पिचड, आ. संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळंबकर यांचीही उपस्थिती होती.

संबंधित लेख