मुंबईकरांच्या नागरी समस्या जैसे थे - चित्रा वाघ

12 Jul 2017 , 08:50:48 PM

स्वाईन फ्लू, कचरा व्यवस्थापन, महिलांच्या आरोग्याबाबतीत पालिका उदासीन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर मुंबईकरांच्या समस्या मांडल्या.

आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, वॉटर-गटर-मिटर या मुंबईकरांच्या समस्यांवर महापालिकेच्या सभेत मोठी चर्चा होते, पण त्यातून काहीच हाती लागत नाही. शहरावर स्वाईन फ्ल्यूचा धोका घोंगावतोय. मात्र पालिका त्यावर काही उपाययोजना करताना दिसत नाही. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये योग्य औषधसाठा उपलब्ध नसून लोकांचा पालिकेच्या हॉस्पिटलवरून भरवसा उठलाय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

महानगरपालिकेकडे जे प्रसुतीगृह उपलब्ध आहे तेथे गावगुंडांनी हैदोस घातला आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शहरात पाण्याची मोठी अडचण आहे. पाणी योग्य वेळी येत नाही, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. शहरात प्लास्टिक बॅगचा सर्रासपणे वापर होतो. कचऱ्याचे नियोजन करण्याच्या बाबतीतही पालिका प्रशासन फेल ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित या गोष्टींवर लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

१ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायटीनेच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे फर्मान पालिकेने काढले आहे, यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की पालिका आपली जबाबदारी लोकांवर थोपवत आहे. महानगरपालिकेने लोकांवरच जबाबदारी टाकणे चुकीचे आहे. यावेळी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, गटनेत्या राखी जाधव आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.

संबंधित लेख