बीफची व्याख्या सरकारने स्पष्ट करावी - नवाब मलिक

15 Jul 2017 , 09:33:14 PM

देशभरात गो हत्या, गोवंश हत्याबंदी या नावाने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरियाणा आणि अन्य ठिकाणी गो मासांच्या नावावर लोकांची हत्या करण्यात येत आहे. आता हे लोण महाराष्ट्रातही येऊन पोहोचलं आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील बारशिंगी गावातील इस्माईल शाह हे ग्रामीण भागात बीफ पोहोचवतात या संशयावरून त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बीफची व्याख्या नेमकी काय आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की जे लोक कायदा हातात घेतात त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी संघ परिवारातील व भाजपाच्या लोकांना बीफची व्याख्या स्पष्टपणे सांगावी.

ताडदेव परिसरात अतिरिक्त एफएसआय कसा दिला ? 
मुंबईतील हनुमान नगर येथील एस आर ए च्या वादावर बोलताना मलिक म्हणाले की या प्रकरणात मंत्र्यांचं आणि स्थानिक आमदारांचं नाव पुढे येत आहे. मात्र मंत्र्यांचं आणि आमदारांचं त्या प्रकरणाशी काही संबंध येत नाही. एस आर ए चे सर्वेसर्वा मुख्यमंत्री असतात. त्यामुळे या घोटाळ्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. ताडदेव परिसरात अतिरिक्त एफएसआय कसा देण्यात आला हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात जेल विभागाचा भोंगळ कारभार ... 
राज्यात जेल विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मंजुळा शेट्ये यांची तुरुंगात हत्या करण्यात आली होती. काही कारागृहात मोबाईल सापडले होते. आता ६० ते ७० महिला कर्मचाऱ्यांचे कारागृहात लैंगिक शोषण केले जाते असा प्रकार समोर आला आहे. हे अत्यंत धक्कादायक असून सरकारचा जेल प्रशासनावर वचक राहिलेला नाही असे ते म्हणाले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी. तसेच जे लोक या प्रकरणात आहेत त्यांना बडतर्फ करावं अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख