२० जुलै रोजी सरकारविरोधात चक्काजाम तसेच जेलभरो आंदोलन करणार - पांडुरंग बरोरा

21 Jul 2017 , 06:01:19 PM

आज ठाण्यात टिप-टॉप प्लाझा येथे ठाणे ग्रामीण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा व संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, राष्ट्रवादीच्या उपस्थित नेत्यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपली जबाबदारी आपण आता ओळखायला हवी, याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली. तसेच, संपूर्ण राज्यात नुसता हाहाकार माजला आहे. यविरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याबाहेर पडावं लागेल. प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल, असे आवाहनही केले. पवार साहेबांनी जे फूड सिक्युरिटी बिल आणलं त्याची अंमलबजावणी आज होताना दिसत नाही. कुपोषणग्रस्त बालकांची संख्याही वाढत आहे. या सरकारने अनेक योजना आणल्या पण फक्त कागदावरच आहेत. यांचा समाचार घेण्यासाठी आपल्याला मंत्रालयात धडक द्यावी लागली तरी चालेल, असे त्या म्हणाल्या.

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी हे सरकार धर्माच्या नावावर प्रचंड राजकारण करत आहे. जे अस्तित्वातच नाही ते लोकांना दाखवलं जात आहे. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याचं निरीक्षण करायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला. तर, आ. पांडुरंग बरोरा यांनी काही जण राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही परिस्थितीत डगमगणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, समृद्धी महामार्गाचा गहन प्रश्न ठाणे जिल्ह्यासह राज्यावर येऊन पडला आहे. हे सरकार स्पष्टपणे नागरिकांची फसवणूक करत आहे. २० जुलै रोजी सरकारविरोधात चक्काजाम तसेच जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी माजी खासदार व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख जयदेव गायकवाड, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, माजी खासदार संजीव नाईक, आ. जगन्नाथ शिंदे, आ. निरंजन डावखरे आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख