शरद पवार यांचा संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने औरंगाबाद येथे नागरी सन्मान

01 Aug 2017 , 06:05:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज औरंगाबाद येथे नागरी सत्कार समिती व संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आ. जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, आ. जयदत्त क्षिरसागर, आ. राजेश टोपे, माजी खा.पदमसिंह पाटील, , अर्जुन खोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी शरद पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार साहेबांच्या लोकाभिमुख राजकारणाचे कौतुक केले. देशाला कसली गरज आहे हे फक्त पवारच जाणतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आमच्यात मतभेद आहेत मात्र मनभेद नाही असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. साहेब म्हणजे विरोधातील लोकांचा मान सन्मान ठेवणारा, त्यांच्या सूचनांचा विचार करणारा , पक्षाच्या पलीकडे जाऊन एकमेकांबद्दल प्रेमभाव ठेवणारा नेता! परिपक्व राजकीय संस्कृतीचा पुरस्कर्ता,मलोकशाहीवर श्रध्दा ठेवणारा नेता, असे म्हणत त्यांनी पवार यांची प्रशंसा केली. तर, खा. चंद्रकांत खैरे यांनी पवार साहेब म्हणजे मराठी खासदारांचा आधार अशा शब्दात त्यांची स्तुती केली. पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचे वर्णन लिव्हिंग लेजेंड असे केले. ते पवार नाही पावर आहेत असं म्हणत ते राजकारणाचे एव्हरेस्ट असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्रातील उत्तुंग नेत्याचा सत्कार करण्यासाठी मराठवाड्याचे सुपुत्र स्व.विलासराव देशमुख आणि स्व. गोपिनाथराव मुंडे आज हयात नाहीत. ते हयात असते तर या कार्यक्रमाची शोभा अजून वाढली असती. साहेब भूकंप झाल्यावर पीडितांसाठी धाव घेणारा संवेदनशील नेता तर आहेतच पण प्रसंगी राजकीय भूकंप घडवण्याची ताकद असणारा नेता आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. ऱावसाहेब दानवे यांनी येथे बोलताना सुरूवातीच्या काळात दिल्लीला पवार साहेबांचे घर आमचे घर वाटायचे. समोरच्याचे बोलणे पवार साहेबांइतके शांतचित्ताने ऐकणारा दुसरा नेता नाही. दौऱ्यात बदल झाला तर कार्यकर्त्याला फोन करून सांगणारा साहेबांसारखा दूसरा नेता मी उभ्या महाराष्ट्रात पाहिला नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साहेबांच्या प्रत्येक क्षेत्रातील योगदानाला मानाचा मुजरा करण्याकरिता आम्ही सारे आलो आहोत, असे म्हणतानाच किल्लारीचा भूकंप पहाटे झाला, साहेब सकाळी ७ वाजता लातूरमध्ये हजर होते. मराठवाडा हे कदापि विसरू शकत नाही, असे सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठवाड्याचं पवार साहेबांसोबत असलेल्या एक अतूट नात्याचे कथन केले. समाजकारणाचं आणि राजकारणाचं चालतं बोलतं विद्यापिठ म्हणजे साहेब! आणि त्या विद्यापीठात शिकताना मला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सुनिल तटकरे यांनी पवार साहेबांचा आजही तिसऱ्या पिढीशी असलेला संवाद आणि त्यांच्या दूरदृष्टीचे येथे बोलताना वर्णन केले.⁠⁠⁠⁠

संबंधित लेख