राज्याच्या नगरविकास खात्यात प्रचंड गोंधळ; जयंत पाटील यांची भाजप-शिवसेनेच्या कारभारावर चौफेर फटकेबाजी

02 Aug 2017 , 07:08:55 PM

राज्याच्या नगरविकास खात्यात प्रचंड गोंधळ; जयंत पाटील यांची भाजप-शिवसेनेच्या कारभारावर चौफेर फटकेबाजी
मुंबईसह राज्यातील कोणत्याच शहराचा विकास होताना दिसत नाही, राज्य सरकारच्या नगरविकास खात्यात प्रचंड गोंधळ आहे असं म्हणत आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह केले. मुंबईसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या वाईट परिस्थितीवर मांडण्यात आलेल्या विरोधकांच्या प्रस्तावावर ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की मागे आपल्या ट्विटरद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की मुंबई शहर हगणदारीमुक्त झाले आहे, मात्र खरी परिस्थिती तशी नाही. मुंबईतील अनेक भागात घाणीचे साम्राज्य आहे. जर मुंबई सारख्या जागतिक शहराची ही परिस्थिती असेल तर राज्याच्या इतर शहरांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज येतो, असा टोला त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर लगावला. मुंबईतील ५७ लाख महिला रोज आपल्या कामानिमित्त बाहेर पडतात पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीत अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. सरकार जनतेला स्वस्त दरात घरं देण्याचं स्वप्न दाखवत आहे. २२ लाख घरं बांधण्याची घोषणाही सरकारने केली मात्र अद्याप एक तरी घर बनलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एस आर ए प्रकल्पातील घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले की राज्याच्या एस आर ए प्रकल्पांमध्ये प्रचंड घोटाळा आहे. एका विकासकाने संदीप येवले नावाच्या माणसाला एक कोटी रुपयांची लाच दिली त्यातले ४० कोटी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलेआम दाखवले तरी त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आपलं बिंग फुटेल की काय अशी भीती सरकारला होती म्हणून न संदीप येवले यांना अटक झाली ना त्याच्यावर कोणती कारवाई झाली असा आरोप त्यांनी केला. मोजक्या बिल्डरांच्या फायद्यासाठी सरकार काम करत आहे. एस आर ए च्या कायद्याविरोधात जाऊन कामं केली जात आहेत. एका प्रोजेक्टचा एफएसआय दुसऱ्या प्रोजेक्टला वापरला जात आहे हे मी पहिल्यांदाच बघतोय. या सगळ्या गोष्टींची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात शिवसेना-भाजपच्या सुरू असलेल्या वादाचाही जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी शिवस्मारकाच्या भूमीपूजनानिमित्त मुंबईत आले तेव्हा मोदींनी फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच कौतुक केलं. २५ वर्ष जी शिवसेना सत्तेत होती त्यांचा साधा उल्लेखही पंतप्रधानांनी केला नाही. शहरात काही झालं की भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मातोश्रीकडे बोट दाखवतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकांदरम्यान भाजपने शिवसेनेवर प्रचंड आरोप केले मात्र त्याची चौकशी झाली की नाही याची माहिती सभागृहाला मिळायला हवी. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकता दाखवली आहे का हे सभागृहाला कळायला हवं अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख