पवार साहेबांच्या संसदीय कारकीर्दीच्या ५० वर्षांना 'पवार युग' म्हटलं तर वावगं ठरणार नाही, जयंत पाटील यांचे सभागृहात गौरवोद्गार

07 Aug 2017 , 10:11:00 PM

आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मा. खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील म्हणाले की आम्ही लहान असताना पवार साहेबांची एक मोहिनी आमच्यावर पडली होती. ५० वर्षात पवार साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केली. एवढ्या निष्ठेने पवार साहेबांच्या पाठिशी लोक का उभे राहतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पवार साहेब नेहमीच राज्याच्या उभारणीसाठी चर्चा करतात म्हणूनच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या कारकीर्दीत पवार साहेब अपराजित राहिले. राजकारणातच नाही तर त्यांनी आपल्या आजारावरही मात केली. त्यांनी अनेकांचा पराभव केला पण त्याचा त्यांनी गर्व केला नाही. पवार साहेबांनी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला. त्या मुलाने भारतातील सर्व महत्त्वाची पदं भूषवली, इथेच लोकशाहीचा विजय झाला. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली नाही पण ते लोकांसाठी नेहमीच पंतप्रधान ठरले. त्यांनी स्वतः सह अनेकांचा विकास केला. अनेकांना महत्त्वाची पदं दिली. या ५० वर्षांना जर 'पवार युग' म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पवार साहेब या सभागृहाच्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहे. जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास मांडला तर त्याचा उल्लेख पवार साहेबांच्या आधीचं राजकारण आणि पवार साहेबांच्या काळातलं राजकारण असा करावा लागेल. राज्यातील प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास पवार साहेबांनी केला. पवार साहेबांनी एका कुटुंबाप्रमाणे सर्वांशी नाते जोडून ठेवले आहे. व्हायब्रंट गुजरात, मेक इन महाराष्ट्रच्या नावाने अनेकांनी आप-आपल्याला राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला याची सुरुवात पवार साहेबांनी केली.
पुढे त्यांना असे नमूद केले की पवार साहेब मुख्यमंत्री असताना मुंबईत बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटाने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हादरून गेलं होतं. पवार साहेबांनी बॉम्बे स्टॉक ऐक्सचेंज १२ तासाच्या आत चालू केलं. लातूरच्या किल्लारी गावात ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी पवार साहेबांनी तिकडे धाव घेतली आणि भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका घेतली. त्यांच्या कामकाजावर अनेकांनी टीका केली, आरोपही केले. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला गेला. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. एनरॉनच्या विषयात आरोप झाले मात्र साहेबांनी त्या आरोपांनाही तोंड दिलं. महाराष्ट्राच्या उभारणीत राजकारण यायला नको हे पवार साहेबांचं धोरणच होतं. त्यांनी सभागृहात सर्वात पहिलं केलेलं भाषण हे शेतीविषयी होतं. अन्नधान्य आयात करणारा देश २०१४ मध्ये अन्नधान्य निर्यात करू लागला हे पवार साहेबांचं यश आहे. त्याच आधारावर त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. मराठवाडा विद्यापीठ, मंडल आयोग अशा अनेक प्रकरणात त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली. महिलांबाबत कोणी विचार करत नव्हतं, पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे महिलांना आरक्षण लाभलं. पवार यांनी नेहमीच लोक उपयोगी निर्णय घेतले. ९९ ला सत्तांतर झालं आणि पवार साहेबांनी कोणतीही प्रथा न पाळता नव्या चेहऱ्यांच्या हाती थेट कॅबिनेटची जबाबदारी दिली. पवार यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. एक काळ होता की लोकांना यशवंतराव चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभायचं आता आम्हाला पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभतंय....त्यांनी फक्त मतं मिळवली नाही माणसं मिळवली, असे म्हणून पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संबंधित लेख