कामावर लक्ष द्या नाहीतर सरकार जाईल - नवाब मलिक

18 Aug 2017 , 09:20:05 PM

मुख्यमंत्री नैराश्यातून मीडियावर आपला राग काढत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. वर्गाच्या मॉनिटरला काम झेपलं नाही तर तो जशी चिडचिड करतो तसे मुख्यमंत्री करू लागले आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी आता कामावर लक्ष केंद्रित करावे तरच नैराश्य जाईल नाहीतर सरकार जाईल असा सल्ला मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता हमीभावाबाबत बोलत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गावोगावी फिरून शेतमालाला हमीभाव देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करु असे सांगत होते. ती सर्व जुमलेबाजी होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलत आहेत. विरोधकांमध्ये ताकद नाही असे मुख्यमंत्री म्हणतात पण त्यांची निम्मी ताकद आमच्यावर टीका करण्यात जाते. राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर अपयशी ठरलं आहे. आता सरकार आपली चूक झाकण्यासाठी विविध स्पष्टीकरण देत आहे. कर्जमाफी जाहीर करून आज दोन महिने होतील पण तरीही त्याचा फायदा अद्याप कोणाला झाला नाही असं ते म्हणाले.

संबंधित लेख