मुंबई विद्यापीठाचा ऑनलाईन निकाल आणि ऑनलाईन कर्जमाफी; दोन्ही मुद्द्यांवर सरकार फेल - सुनील तटकरे

22 Aug 2017 , 09:40:42 PM

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची तिसरी डेडलाईन उलटूनही लाखो विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. ऑनलाईन पेपर तपासणीचा फंडा काय होता, हे आता लोकांना कळून चुकले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन निकालांची ही परिस्थिती असेल तर ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारच्या ऑनलाईन कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाचा निकाल असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन्ही मुद्द्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस.च्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होत्या.

मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका करताना तटकरे म्हणाले की निकाल लावण्यात घोळ होऊन सुद्धा विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी न करता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करणाऱ्या कुलगुरुंची हकालपट्टी करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने विद्यापीठाच्या अपयशाची जबाबदारी त्यांचीही आहे. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा घोटाळा केला आहे, असे म्हणत तटकरे यांनी सरकारवर आरोप केला.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची दुबार पेरणी वाया गेली आहे आता तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष न देता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल याकडे दोन्ही सत्ताधारी पक्षांचे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी शेतकऱ्यांची चिंता करावी, असा सल्ला त्यांनी शिवसेना-भाजपला दिला.
सरकारने ३४ हजार कोटींची ८९ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तरी शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. दुर्दैवाने सत्तेमधील लोकांना याचे गांभीर्य कळत नाही. दुबार पेरणी वाया गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली.

कृषीमंत्री सुभाष देशमुख म्हणतात की कर्जमाफीसाठी १० लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. सरकारने लाख किंवा हजार सोडा कर्जमाफी मिळालेल्या किमान १० शेतकऱ्यांची नावे जाहीर करावीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारचे जाहीर अभिनंदन करेल, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. ट्विटरवर सतत टिव टिव करणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निद्रिस्त अवस्थेत आहे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. अधिवेशन संपून आज आठ दिवस उलटले आहेत तरी सुभाष देसाई यांची चौकशी कधी करणार याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. त्यांची चौकशी कोण करणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला तात्काळ द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संबंधित लेख