राज्यकारभार कसा करायचा हे पवारांकडून शिकावं - भाई वैद्य

02 Sep 2017 , 10:23:20 PM

जाती, पक्ष, पंथाच्या पलिकडे जाऊन मैत्री संबंध जोपासणारा नेता - गिरिश बापट
श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे संस्थेच्यावतीने पवार साहेबांचा सत्कार

पुणे - श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे या संस्थेच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे सत्कार सोहळा संपन्न झाला. मा. शरद पवार यांचा यथोचित सत्कार करून श्री शिवाजी मराठा सोसायटीने शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ केला. याबद्दल भाई वैद्य यांनी मराठा सोसायटीचे अभिनंदन व्यक्त केले. आपल्या भाषणात भाई वैद्य म्हणाले की, शरदराव हे एक अनुभवसंपन्न, तडफेने काम करणारे पुरोगामी नेते आहेत.

उत्तम प्रशासक म्हणून ते फार वरच्या दर्जाचे आहेत. ते मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाच्या जेव्हा बैठका होत त्यावेळी शंकरराव चव्हाणांसारखी ज्येष्ठ मंडळी देखील सहकार्य करत. ज्येष्ठत्वाचा तोरा मिरवत नसत. व्ही. प्रभाकर सारखे उत्तम प्रशासकीय सचिव सुद्धा साहेबांपुढे झुकताना मी पाहीले, त्यावेळी धन्यता वाटे. राज्यकारभार कसा करायचा, राज्य कसे चालवायचे, हे शरद पवारांकडून शिकावे. भूकंप, दुष्काळ, बॉम्बस्फोट अशा आपत्तीप्रसंगी ते कधीही गडबडले नाहीत, असे गौरवोद्गार भाई वैद्य यांनी काढले.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीसुद्धा या सोहळ्यात उपस्थित राहून पवार साहेबांचे गुण विशद केले. बारामतीसारख्या दूर ठिकाणावरून पुण्यात येऊन कारकीर्द घडवणारे मोजकेच असतील. राजकीय जीवनात अनेक येतात अन् जातात, पण शरदरावांनी आपले राजकीय अस्तित्व पन्नास वर्षे प्रभावीपणे अविरत टिकवले. चेहऱ्यावरील स्थैर्यभाव हा एक त्यांचा गुण मला भावतो. विजय मिळो अथवा पराभव पदरी पडो तो चेहरा बदलत नाहीत, इतकी विचाराची बैठक व परिपक्वता त्यांच्या ठायी आहे. सत्तेवर असताना आणि नसतानाही अस्तित्व टिकवणारा असा दुर्मिळ नेता त्यांच्या रूपाने आपल्या राजकीय पटलावर आहे. जाती, पक्ष, पंथाच्या पलिकडे जाऊन मैत्री संबंध जोपासणारा नेता म्हणून त्यांच्याकडून मी शिकलो आहे, अशी प्रतिक्रिया बापट यांनी यावेळी दिली.

आपल्या भाषणात आदरणीय शरद पवार यांनी श्री शिवाजी मराठा सोसायटी संस्थेचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्रामधील सर्वसामान्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ज्या संस्थांनी वाहिली त्या संस्थांमध्ये श्री शिवाजी मराठा सोसायटी संस्थेचा उल्लेख करता येईल. ज्ञानसंपन्न पिढी घडवण्याचे काम करणारी ही एक जुनी संस्था असल्याचे पवार यांनी सांगितले. आज ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या पुष्कळ संस्था आहेत. शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे पण त्याचबरोबर गुणवत्ता वाढीचे काम ही त्या संस्थांकडून झाले पाहिजे. बारामतीतली करीश्मा इनामदार ही मुस्लीम समाजातील शिक्षकाची मुलगी बुद्धी आणि कष्टाच्या बळावर नासा संस्थेकडे संशोधनासाठी निवड होऊन काम करते आहे. बारामतीमधल्या दुसऱ्या एका खेड्यातील मुलीचा बुद्ध्यांक आईनस्टाइनपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येणाऱ्या अशा मुला-मुलींचा मला अभिमान वाटतो, अशी भावना यावेळी पवार साहेबांनी व्यक्त केली.

संबंधित लेख