दिवाळीपर्यंत तरी सरकार कर्जमाफी देईल का? - सुनील तटकरे

06 Sep 2017 , 10:30:07 PM

सरकारने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे. हे आधीपासूनच आम्ही सांगत होतो. ऑनलाईन अर्जाचे नवीन फॅड काढत आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन प्रक्रियेमध्ये भरडण्याचे काम सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. ५१ लाख अर्ज प्राप्त झाले असे सरकार सांगत आहे. ५१ लाखांपैकी किती अर्ज तुम्ही ठरवलेल्या निकषांप्रमाणे पात्र झाले आहेत? या पात्र झालेल्या अर्जदारांना दिवाळीपर्यंत तरी कर्जमाफी मिळेल का याबाबत आमच्या मनात साशंकता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनिल तटकरे यांनी सांगितले.

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी २६ हजार केंद्र निर्माण केली आहेत. याचा अर्थ त्याच केंद्रावर अर्ज पात्र की अपात्र ठरवणारी यंत्रणा उभी करता येऊ शकते. त्यातून पात्र-अपात्र अर्ज ठरवता येतील. बोगस अर्ज आले तरी ते नामंजूर येतील. परंतु अट्टाहासासाठी ऑनलाईन पद्धत स्वीकारली. एवढंच नाही तर सरकारला वेळ घालवायचा होता म्हणूनच त्यांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असा आमचा आरोप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ३४ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी असा ढोल जेव्हा एका बाजूला बडवला जातो त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले आहे, हे ही पाहिले पाहिजे. आमची मागणी आहे की, जे काही अर्ज पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यात तरी कर्जमाफीची रक्कम भरा.

प्रामाणिक, गरजू, भरडलेल्या शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणे सरकारने थांबवावे. आता तातडीने कर्जमाफी दिली गेली पाहिजे. इतर याद्या जेव्हा केव्हा प्रसिद्ध करायच्या असतील तेव्हा करा. २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकारने मंजूर करुन घेतल्या आहेत. आता सरकारला नेमकी अडचण काय आहे? यंदा पाऊस चांगला झाला. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी खरिपाच्या पिकासाठी याचा फायदा होणार नाही. कारण सरकारने खरिपासाठी दहा हजाराची उचल तातडीने देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते किती शेतकऱ्यांना मिळाले हे ही सांगावे. सरकारने दांभिक घोषणा थांबवून काहीतरी कृती करावी, अशी आमची मागणी असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

संबंधित लेख