शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महागाई विरोधात आंदोलन

19 Sep 2017 , 08:42:23 PM

देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वाखाली शहापूर येथे भाववाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चेरपोली परिसरातील पेट्रोल पंपासमोर प्रचंड घोषणाबाजी केली.


सरकारचा कारभार हातात घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोठे आश्वासन दिले होते. देशातील महागाई कमी करू असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते मात्र आज सरकारला साडे तीन वर्ष होत आहेत तरी अद्याप महागाई कमी झाली नाही, उलट महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मोदींची घोषणा संपूर्णपणे फोल निघाली असा आरोप आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला. पंतप्रधान मोदी आपला शब्द पाळण्यात अपयशी ठरले आहेत असेही ते म्हणाले. सरकारने पेट्रोलचे वाढवलेले दर, महागाई मागे घ्यावी अन्यथा जनता सरकारमधील लोकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला.

या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख