नगरपंचायत निवडणुकीचे निकाल ही सरकारच्या जनहितविरोधी कारभाराची प्रतिक्रिया- धनंजय मुंडे

11 Jan 2016 , 08:02:26 PM

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला दूसरे स्थान मिळाले असून या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच जनतेने सत्ताधारी भाजपा- शिवसेनेला स्पष्टपणे नाकारून राज्यातील जनहितविरोधी कारभाराबद्दल प्रतिक्रिया दिली असल्याचे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या २० नगरपंचायतींच्या निवडणुकांतील ३३१ जागांपैकी ८४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. काँग्रेसला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या आहेत,सत्ताधारी शिवसेना ५८ जागांसह तिसऱ्या स्थानावर फेकला गेला असून प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला तर केवळ ३२ जागा कशाबशा मिळवता आल्या आहेत व हा पक्ष चौथ्या स्थानावर गेला आहे.  सरकारमधील अनेक मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातील नगरपंचायतीही जिंकता आल्या नाहीत, याचाच अर्थ जनतेच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल रोष असून त्यांनी तो या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. निवडणुका झालेल्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. सरकार दुष्काळग्रस्तांकडे करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल जनतेने मतदानाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 

यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती,महानगरपालिका-नगरपालिका निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी बजावेल असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. जामखेड, शेवगाव, माणगाव, म्हसळासह अनेक प्रमुख नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्याची माहीतीही मुंडे यांनी दिली.

संबंधित लेख