लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला आहे - सुप्रिया सुळे

21 Sep 2017 , 07:46:58 PM

दिवसेंदिवस राज्यात छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका लहान मुलाची हत्या करण्यात आली. लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला असल्यामुळेच अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. जागर युवा संवाद यात्रेनिमित्त इस्लामपूर येथे असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की पूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना फार कमी ऐकायला मिळायच्या. आज रोज अशा घटना ऐकायला मिळतात. मुलांसाठी शाळांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. समाज म्हणून हे आपले अपयश आहे. आपण सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. सरकारच्या कारभारावर टीका करत सुळे म्हणाल्या की सरकारचा विकासाचा एजेंडा बाजूला राहिला आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत हे सरकार वेगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. या सरकारच्या पारदर्शकतेचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ऐन दिवाळीत या सरकारने गरीबांच्या तोंडची साखर पळवली. या सरकारच्या काळात सर्वच घटक निराश आहे अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

एसी रूममध्ये बसून युद्धाची भाषा करणे सोपे...
सीमा भागातील तणावाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या की युद्ध करणे कोणत्याच देशाला परवडणारे नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाही. मुंबईतल्या एसी रूममध्ये बसून युद्धाची भाषा करणाऱ्यांनी एकदा शहीदाच्या परिवाराच्या भावना समजाव्यात अशा त्या म्हणाल्या.

संबंधित लेख