बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार - नवाब मलिक

21 Sep 2017 , 10:57:45 PM

इकबाल कासकरला खंडणी प्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इकबाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिले होते. असे तथ्यहीन वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. ज्या वृत्तवाहिन्या आपली चूक लक्षात घेऊन माफी मागणार नाहीत त्यांच्याविरोधात खटला दाखल करु, असे सुतोवाचही नवाब मलिक यांनी केले.

याबाबत माहिती देताना मलिक म्हणाले की इकबालच्या अटकेनंतर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अटकेचा सर्व तपशील दिला होता. त्यामध्ये त्यांने कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्या पक्षातील नेत्यांची नावे घेतलेली नव्हती. तरिही काही वाहिन्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन बेजबाबदारपणे बातमी चालवली. तब्बल ४० वाहिन्यांचे व्हीडियो राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवले आहेत. ज्या वाहिन्यांनी जाणूनबुजून बातमी चालवली, त्यांना नोटीस पाठवण्यात येईल. वाहिन्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तयारी पक्षातर्फे केली जाईल, असे मलिक यांनी सांगितले. 

फसव्या कर्जमाफी विरोधात राष्ट्रवादीचे १ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन

राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करू असे सांगून किचकट निकष लावत कर्जमाफी केली. पण अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही. ८९ लाखांपैकी अर्ध्या लोकांचेही ऑनलाईन फॉर्म भरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकरी आत्महत्या करत आहेत. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्याचे महसूल मंत्री मात्र १० लाख बोगस शेतकरी असल्याचे सांगतात. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. ज्याप्रमाणे एेश्वर्या राय, अमिताभ बच्चन हे जमिनखरेदी प्रकरणी शेतकरी नसून बोगस शेतकरी असल्याचे बाहेर आले होते. त्यांच्याप्रमाणेच महसूल मंत्री सांगतात तसे १० लाख शेतकरी बोगस आहेत का? असे असेल तर त्यांची नावे सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी मलिक यांनी केली. 

कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तहसील, जिल्हानिहाय आंदोलन करणार आहे. शेतकर्‍यांची १०० टक्के सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या मागण्यांचे निवेदन देऊ, असे मलिक यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणूका घेऊन करणार लोकशाहीचा सन्मान

निवडणूक आयोगाने नोंदणीकृत राजकीय पक्षांना अंतर्गत लोकशाही पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे २ ऑक्टोबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ही नोंदणी चालेल. ही नोंदणी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० या तीन वर्षांसाठी असेल. 

संबंधित लेख