सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते - सुनिल तटकरे

23 Sep 2017 , 09:49:17 PM

ओबीसी समाजाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष
ओबीसी समाजाच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाकडे सरकार कमालीचे दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तताही केली नाही. आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादीने शिष्यवृतीतही वेळोवेळी वाढ केली होती. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होत आहे. त्यामुळेच सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते. आपला जनाधार जास्त हे यातून स्पष्ट होते. सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.

राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ओबीसी सेलचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,  माजी खासदार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व निरीक्षक बसवराज नागराळकर आणि ओबीसी सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेने केलेल्या पेट्रोल दरवाढ आंदोलनावर तटकरे यांनी टीका केली. शिवसेना सरकारमध्ये सामील आहे, मग निर्णय घेत असताना शिवसेनेचे मंत्री काय करतात? शिवसेनेचा दुटप्पीपणाचा हा बुरखा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फाडायला हवा, असे निर्देश तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे म्हणाले की भाजप सरकार ओबीसी समाजाच्या जोरावर उभे राहिले आहे पण भाजपने आता ओबीसी समाजालाच दुर्लक्षित केले. आपण सेलचे संपूर्ण राज्यभरात हजारो सक्रीय कार्यकर्ते तयार करू. येणाऱ्या काळात संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा करू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे - अजित पवार
भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ
भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. अंगणवाडीसेविकांनी सरकारविरोधात प्रचंड मोर्चा काढला पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. राज्यात कोळसा नाही म्हणून लोकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने थाटामाटात कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. नाशिक जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांचे जीव गेले. हे सरकार काय झोपा काढत आहे का? पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला.

सध्या जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे केले जात आहे. मागासवर्गीय समाजावर हल्ले केले जात आहे, लोकांचे जीव घेतले जात आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे ? सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली. सरकारचे मंत्री, अधिकारी स्वतःच्याच मुलांसाठी सरकारी योजना लाटत आहेत. मग आर्थिक दुर्बल असलेली जनता कुणाकडे जाणार, असा सवाल करत अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

बुलेट ट्रेनचा फायदा मुंबईला होणार नसून गुजरातलाच होणार आहे. कोणतीही निवडणूक आली की पंतप्रधान थेट उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतात. सरकारने वापरात असलेल्या रेल्वे मार्गात सुधारणा करावी मगच बुलेट ट्रेन आणावी. हे सरकार सर्व गोष्टीत अपयशी ठरले आहे. या सरकारचे पितळ उघडे करण्याचे काम आपल्याला करायला हवे, असा संदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे?
आरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल समोर मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला पुढे आणण्यासाठी अनेक निर्णय घेतले हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठासून सांगायला हवे. आपण जर आता सावध नाही झालो तर भविष्यात आपल्याला फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार दिसणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण काढून घ्यायला हे सरकार मागेपुढे बघणार नाही. आरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे.

भाजप सरकारच्या काळात जेवढा अन्याय ओबीसीवर झाला तो आजपर्यंत कोणत्याच सरकारच्या काळात झाला नव्हता. ओबीसी समाजाच्या नेत्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. राष्ट्रवादीवर विरोधकांनी जाणीवपूर्वक विविध आरोप केलेत. हे आरोप खोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला हवे, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

आज समाजातील प्रत्येक घटकात एक भीतीचे वातावरण आहे. युवकांविरोधात कटकारस्थान हे सरकार रचत आहे. युवक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी येथे बोलताना केला.

ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे म्हणाले की ओबीसी सेल संपूर्ण राज्यभरात हजारो सक्रीय कार्यकर्ते तयार करणार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा करू. भाजप सरकार ओबीसी समाजाच्या जोरावर उभे राहिले आहे पण भाजपने आता ओबीसी समाजालाच दुर्लक्षित केले.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, माजी खासदार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व निरीक्षक बसवराज नगराळकर तसेच ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.

संबंधित लेख