भाजप सरकारच्या अधोगतीला सुरुवात - अजित पवार

02 Oct 2017 , 07:16:54 PM

जनतेने भाजपला मोठ्या विश्वासाने निवडून दिले होते, पण आता सर्वच नाराज आहेत असे वक्तव्य करत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोलापूर येथील मेळाव्यात सरकारची अकार्यक्षमता पुढे आणली. सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळते. सीमा भागातले लोक कर्नाटकात जातात आणि तिकडून पेट्रोल भरून येतात. या सरकारने गोरगरिबांची साखरच काढून घेतली. भाजप-शिवसेनेमुळे राज्याला वीजेची टंचाई होत आहे. राज्यात गुंतवणूक थांबली, रोजगार उध्वस्त झाले. विकास दर घसरला आहे. सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणाऱ्यांवर केसेस टाकल्या जातात. राज्यात अराजकता निर्णाण झाली आहे. भूलथापा मारणाऱ्या भाजपवर सोशल मीडियाचा उलटा प्रभाव झाला. भाजप सरकारच्या अधोगतीला सुरुवात झाली असल्याची टीक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सुरु केलेला मंथन दौऱ्यानिमित्त आज सोलापूर जिल्ह्यात शहर व ग्रामीणचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंखे, कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे, आमदार दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख आमदार अॅड. जयदेव गायकवाड, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, डॉक्टर सेलचे राज्यप्रमूख डॉ. नरेंद्र काळे, जि.प. सदस्य उमेश पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, निरीक्षक प्रदीप गारटकर, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सरकार शेतकऱ्यांची अब्रू वेशीवर का टांगतंय. कर्जमाफीचा खेळखंडोबा सरकार तर्फे सुरू आहे. अंगणवाडी सेविकेला १०० रुपये रोज दिला जात आहे आणि इतर गोष्टींवर भरमसाट रुपये खर्च केले जात आहे. हा कोणता न्याय आहे ? हे अत्यंत चुकीचं आहे. हे चित्र बदलायला हवे. वारं कोणत्याही दिशेने फिरलं तरी नुकसान आपल्याला होणार नाही अशी तयारी आपण करायला हवी. देशभरात आता वातावरण बदलत आहे. वेगळ्या प्रकारची आणीबाणी देशात आणली जात आहे. ही परिस्थिती बदलायला हवी असे वक्तव्य त्यांनी केले.

सोलापूरच्या कार्यकर्त्यांनो मरगळ झटकून कामाला लागा - सुनील तटकरे
सोलापूरची जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात नाही हे पहिल्यांदा घडत आहे. याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने आपण वैचारिक सीमोल्लंघन करायला हवे. जिल्ह्यातील प्रत्येक मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पडेल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

अच्छे दिनचा वादा सरकारने केला होता. आज कोणाला अच्छे दिन आले आहे का असे विचारले तर नकारात्मक उत्तर मिळेल. शेतकऱ्याच्या तरुण मुलीने आत्महत्या केली. इतके वाईट दिवस राज्याने कधी बघितले नव्हते. शेतकऱ्याचे कर्जमाफ व्हावे यासाठी अजितदादांनी संघर्षयात्रेची संकल्पना मांडली आणि विरोधीपक्षाने संघर्षयात्रा काढली. शेतकऱ्यांनी संप पुकारला तेव्हा कुठे सरकार जागे झाले आणि कर्जमाफीची घोषणा केली. ही कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांना बोगस म्हणून हिणवतात. मात्र जनता या सरकारला बोगस ठरवल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला यांची जागा दाखण्याची गरज आहे असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला.

दुखतंय पण सांगता येत नाही अशी अवस्था जनतेची झाली असल्याचे वक्तव्य दिलीप सोपल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ते जनतेला पटवून दिलं पाहिजे असे आवहानही केले. अच्छे दिन म्हटलं की आता हसू येऊ लागलं आहे. या सरकारच्या काळात कोणताच घटक समाधानी नाही. अच्छे दिनाचा भोपळा फुटलाय, असे वक्तव्य करत चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली. आघाडी सरकारच्या काळात रोज जनता दरबार भरायचा आता जनतेकडे लक्षच दिले जात नाही. भाजपचे लोक फक्त जाहिरातीत माहीर आहे अशी खोचक टीका त्यांनी केली. यावेळी अजिंक्य राणा पाटील यांनी सोलापूर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लढा देईल असे आश्वासन दिले. जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्यांना सत्तेबाहेर बसावं लागतं ही खंताची बाब असल्याचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करणाऱ्या अजित पवार यांना मुख्यमंत्री होताना आम्हाला बघायचं असल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख