जपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय – शरद पवार

09 Oct 2017 , 08:09:52 PM

- ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे बैठकीत ठरणार पक्षाची रणनिती

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच भविष्याच्या वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत शरद पवार यांनीही नोंदणी केली व रू. ५५ फी भरली.

सामान्य माणसाच्या प्रवासातील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जात आहेत. या ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे पण त्याला मार्केट नाही. जपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे पक्षाच्या कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक सेल आपापल्या क्षमतेनुसार कामही करत आहेच पण पुढच्या काळात राष्ट्रवादी बुथ लेवलवरही लक्ष देईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी येथे स्पष्ट कले. नवीन सभासद नोंदणीची कार्यक्रम विद्यार्थी, युवक, युवती, महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांनी व्यापक व आक्रमकपणे आंदोलन करावे. पक्षासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. एकाच टप्प्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्यामुळे आपण आताच कंबर कसायला हवी, असे आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. केंद्र व राज्य सरकारविरोधात जनतेत एक जनमत तयार होत आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि विविध गोष्टींबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. विधिमंडळात मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले तेव्हा सत्तेतील लोकांनी पळ काढला, हे राज्यात पहिल्यांदाच घडलं. सरकार विरोधात जनमत तयार करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय होईल, अशी घोषणा करून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले.

ग्रामीण भागात असंख्य प्रश्न आहेत. एसटी बसेसची सेवा योग्यपद्धतीने सुरू नाही. मुलींना छेडछाडीला समोरे जावं लागते. याबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या अद्याप मिळालेल्या नाही. विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे. जनतेचा कोणत्याच पक्षावर विश्वास नाही. नेतृत्वाची कमतरता राज्याला भासत आहे. राष्ट्रवादीसाठी ही सुवर्णसंधी आहे त्यामुळे आपण या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा. प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारी घ्यायला हवी. आपण आत्मचिंतन करायला हवे. पक्षाला आलेली मरगळ झटकून टाकायला हवी. पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, खा. प्रफुल पटेल यांनी एका वर्षाच्या आत देशात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली. राष्ट्रवादी काँग्रेस बाबत अनेकांनी संभ्रम निर्माण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सर्वच जण विरोधक म्हणून काम करत आहे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये भाजपविरोधात वातावरण आहे. गुजरात त्यांचा हातात राहणार की याबाबत शंका आहे. याचा फायदा आपण घ्यायला हवा, असेही त्यांनी सुचवले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे प्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी लोकांमध्ये सरकारबाबत असलेल्या अस्वस्थतेला कुठे तरी वाचा फुटायला हवी. या सरकारविरोधात एक जन आंदोलन सुरू करायला हवे, असे आवाहन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठ्या आक्रमकपणे काम करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा हा उपक्रम आम्ही जोरात राबवत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण राज्यात ५०० राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ५००० शाखा कार्यशील करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख जयदेवराव गायकवाड येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव पर्याय राज्यासमोर असल्याचे म्हणाले. तसेच, खासदार रामदास आठवले मागासवर्गीय तरुणांची दिशाभूल करत आहे. त्यांना दारू पिण्यास सांगत आहे. हे आंबेडकरी चळवळीला न शोभणारे वक्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

बैठक सुरू होण्याआधी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांना तसेच यवतमाळ येथे किटकनाशक फवारणीत मृत्युमुखी पडलेल्या शेतमजूरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खा. धनंजय महाडिक, खा. उदयनराजे भोसले, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी व दिलीप वळसे पाटील, खा. विजयसिंह मोहिते पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व भास्कर जाधव, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख