राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामाजिक विषमतेविरोधात लढा देतील - सुनील तटकरे

17 Oct 2017 , 08:54:59 PM

आजच्या काळातही सामाजिक विषमता पाळली जात असल्याची अनेक उदाहरणे वाचायला मिळत आहेत. ही सामाजिक विषमता संपवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करायला हवे. समाजात प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, अशी भूमिका आदरणीय शरद पवार साहेबांची असते, याच भूमिकेसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे निर्देश सुनिल तटकरे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची राज्य कार्यकारिणीची बैठक आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.

सध्या देशातील वातावरण अस्वस्थ आहे, असे म्हणण्याची परिस्थिती आहे. देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरसंघचालक म्हणतात आरक्षणाबाबत फेरविचार करायला हवा. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून या देशातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा म्हणून आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणाबाबत सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात दिला.

पुढे ते म्हणाले की आंबेडकर स्मारकाबाबत सरकारने मोठा गाजावाजा केला. मुळात आंबेडकरांच्या स्मारकाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती. आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय अजित पवार यांनी वेळोवेळी त्याबाबत प्रयत्न केला होता. या सरकारने स्मारकाचे भूमीपूजन केले पण आज तीन वर्ष झाले सरकार येऊन मात्र अद्यापही स्मारक बांधले गेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबत आंदोलन छेडावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले.

स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून घेणारे नेते आज दलित तरुणांना दारू पिण्यास सांगत आहेत. ही चळवळीवर दुर्दैवी परिस्थिती असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

भावना भडकवून राजकारण करणाऱ्यांचा बुरखा फाडा - अजित पवार
समाजात असहिष्णुता वाढू लागली आहे. महागाईने टोक गाठले आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढते आहे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कोण काय खातंय, कोण काय घालतंय याकडे मात्र यांचे लक्ष असते. गोरक्षक भक्षक बनलेत. जो समोर येईल त्याच्यासोबत मारहाण केली जाते. रोहित वेमुला याची आत्महत्या यांच्याच काळात घडली, आंबेडकर भवन यांच्याच काळात पाडले गेले, दलित मुक्त भारत, मुस्लिम मुक्त भारत अशी भाषा कोणी केली याचा विचार कुठे तरी व्हायला हवा. भावना भडकवून राजकारण करणाऱ्या अशा लोकांचा बुरखा फाडण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरापर्यंत समाजाला एकत्र घेऊन जाण्याची परंपरा जपली होती. भाजप सरकारच्या काळात या परंपरेला तडा गेला. मोदी सरकारच्या काळात मागासवर्गीयांवर हल्ले वाढले. गुजरातमध्ये गरबा बघितला म्हणून दलित तरुणांना ठार मारले. आपला समाज कुठे चाललाय ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

रामदास आठवले म्हणतात दलित युवकांनी रम प्यायली पाहीजे. आठवले जबाबदार मंत्री आहेत त्यांनी तरुणांना असे सल्ले देणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. सरकारविरोधात लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या. याविरोधात आपण आवाज उठवायलाच हवा, अशी भूमिका अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केली.

भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर विकत घेतले. त्यासाठी त्यांनी सामाजिक न्याय खात्याचा निधीचा वापर केला. आता इंदू मिल येथील स्मारकाच्या कामातही सामाजिक न्याय खात्याचा निधीचा वापर केला जात असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.
कार्यकर्त्यांनी लढायला तयार व्हायला हवे, अशा टप्प्यात आपण येऊन पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अॅड. जयदेव गायकवाड यांनी केले. सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांना वाकवणे हे विरोधी पक्षाचे काम असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे काम चोख पद्धतीने पार पाडत आहे. भूमीहीन शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, असे गायकवाड यांनी सांगितले. आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन झाले पण पुढे काय? स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही, याचा जाब सामाजिक न्याय विभाग सरकारला विचारणार असा इशारा गायकवाड यांनी दिला.

रामदास आठवले यांना शरद पवार यांनीच राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. तरी त्यांनी जातीयवादी पक्षाला साथ दिली. कार्यकर्त्यांनी चळवळीचे खरे शत्रू कोण हे ओळखायला हवे. ते समाजाला पटवून द्यायला हवे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश गजभिये यांनी केले.
ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, निरीक्षक बसवराज पाटील नागराकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित लेख