परिवर्तन करायचे असेल तर बुद्धिजीवी वर्गाने पुढे यावे - सुनील तटकरे

23 Oct 2017 , 10:10:26 PM

सध्याची वर्तमान परिस्थिती ही सर्व समाजासाठी आणि पक्षासाठी महत्त्वाची आहे. एका पक्षाचे विचर थोपवण्याचे प्रकार चालू असतानाच घटना दुरुस्तीची चर्चा वारंवार उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच वकिलांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. २०१९ साली परिवर्तन करायचे असेल तर वकील ज्याप्रकारे कोर्टात युक्तीवाद करतात त्याप्रमाणे समाजात जावून राष्ट्रवादीच्या बाजुने युक्तिवाद करत पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली बैठकीला उद्देशून तटकरे बोलत होते.

बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार माजिद मेनन, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सचिन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे लिगल सेलचे राज्यप्रमुख भगवानराव साळुंखे आणि अॅड. आशिष देशमुख उपस्थित होते.
 
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून ही बैठक होत असल्याबद्दल तटकरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. वकिलांकडे बुद्धिजीवी वर्ग म्हणून समाज पहात असतो. आजच्या बैठकीतून राजकीय पक्ष आणि वकील म्हणून चांगल्या प्रकारे संवाद झाला. आम्ही दर तीन महिन्यांनी सर्व सेलची बैठक घेत असतो. यापुढे वकील सेलचीही दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन वकिलांच्या प्रश्नांवर चर्चा करु, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की भारनियमनाची चर्चा आज होत आहे. पवार साहेब राज्याचे प्रमुख असताना वीजेची गरज ओळखून त्यांनी एनरॉनचा प्रकल्प आणला. या प्रकल्पावर टीका करुन युतीने सत्ता मिळवली. मात्र १९९५ साली सत्तेवर आल्यापासून त्यांनी एकही प्रकल्प उभा केला नाही. आदरणीय अजित पवार उर्जामंत्री असताना त्यांनी राज्याला विजेची तफावत जाणून दिली नाही. आज कित्येक संच बंद आहेत. महाराष्ट्र सरकारचे सर्व विद्युत प्रकल्प सुरु असते तर भारनियमनची परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

आजच्या लीगल सेलच्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर वकील उपस्थित होते. यावरुनच राज्यातील बदललेल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जिल्हा सरकारी वकील नेमण्यामध्ये एका राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याची तक्रार अनेक वकीलांनी आज मांडली. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचा लीगल सेल यावर काम करेल. तसेच लीगल सेलसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालय आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. या माध्यमातून वकिलांनी समाजातील उपेक्षित, अन्यायग्रस्त लोकांची मदत करावी, अशी विनंती तटकरे यांनी उपस्थितांना केली.

खासदार माजिद मेनन यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्या प्रकारे मागे आणीबाणी आली होती त्याप्रमाणे आता २०१७ मध्ये सुद्धा छुपी आणीबाणी लादलेली आहे. तसेच बैठकीचे प्रास्ताविक करताना अॅड. आशिष देशमुख म्हणाले की सध्याच्या राजकीय परिस्थितीत जो असंतोष आहे तो समाजातील शिक्षक, डॉक्टर, वकिलांमध्ये दिसून येत आहे. यासाठी वकिलांची राज्यव्यापी बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेणे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती.

बुथ स्तरावर वकिलांची कमिटी नेमून सत्ताधारी विरोधी पक्षांवर दबाव तर टाकत नाही ना, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सामान्य कार्यकर्त्यांवर जर सरकारी यंत्रणा दबाव टाकत असेल तर आपल्याला त्यांचे रक्षण करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
 
माहिती अधिकार, कायदे बनवणे यासाठी लीगल सेलने पक्षाला सहकार्य करावे - सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असताना प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर, प्राध्यापक यांच्यासोबत अनेक वकिलही भेटून चर्चा करत होते. यातूनच पक्षाचा लीगल सेल अधिक अॅक्टिव व्हावा अशी कल्पना समोर आल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालये आहेत. त्या कार्यालयाचा वापर लीगल सेलने करावा. सामान्य जनतेला कायदेशीर मदत देण्यासाठी पक्ष कार्यालयात एखादा कार्यक्रम राबवावा, अशी कल्पना सुळे यांनी मांडली. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव नसते. लीगल एडच्या माध्यमातून त्यांना मदत देता येईल. सरकारची अनेक धोरणे चुकत आहेत. माहिती अधिकाराच्या माध्यमातून कोळशाचे काय झाले, भारनियमनची नक्की काय कारणे आहेत आणि इतर विषयांवर माहिती काढण्याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना देता येऊ शकते. 

तसेच लीगल सेलने कायदे मंडळ जेव्हा कायदा बनवते तेव्हा आपल्या सूचना द्याव्यात. नवा कायदा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असावी, हे लीगल सेल सांगू शकते. याबाबत राष्ट्रवादी मासिकात वकील लेख लिहू शकतात. राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेजवर एखादा ब्लॉग लिहू शकतात. तुमचा आवाज मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देईल, अशी ग्वाही सुळे यांनी दिली. 

संबंधित लेख