राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लातूर येथे रास्ता रोको

24 Oct 2017 , 06:28:35 PM

लातूर-उदगीर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प

उदगीर शहराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी या प्रमुख मागणीसाठी उदगीर-लातूर राज्यमार्गावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

उदगीर शहराला जोडणाऱ्या नळेगाव-उदगीर, जळकोट-उदगीर, उदगीर-मुक्रमाबाद आणि उदगीर-यदीर, उदगीर-अहमदपूर या रस्त्यांची चाळण झाली आहे. या सर्व ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही अलीकडे वाढले आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणक्याच्या व पाठीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या काळात परिसरातील वाहतूक अर्ध्या तासासाठी ठप्प झाली होती. यावेळी समद शेख, सुनील, नंदन पाटील, संदीप पाटील, पंकज कांबळे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख