राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

12 Jan 2016 , 11:24:41 PM


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ या सध्या कोकण दौऱ्यावर असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये चित्राताईंनी संघटन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी महिला कार्यकर्त्यांची भेट घेतली. 

मालवण तालुका-

आपण छान दिसतो, छान बोलतो म्हणून लोकं आपल्याकडे येणार नाहीत तर आपण त्यांची काम करू किंवा त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्यासोबत उभे रहातो म्हणून ते आपल्याकडे येतील. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे आपले काम आहे. तळागळापर्यंत पोहोचलो तरच संघटन वाढेल, असे चित्राताई म्हणाल्या.

देवगड तालुका- 

रडणारी माणसं कुणालाच आवडत नाहीत, सगळ्यांना लढणारी माणसंच आवडतात. त्यामुळे रडणं विसरा आणि लढणं शिका. लोकांच्या छोट्याछोट्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांच्या सोबत उभ्या राहिलात तर त्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल. लोक आपल्यापर्यंत येणार नाहीत तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागणार आहे.काम करत करत तळागळापर्यंत पोहोचलो तरच संघटन वाढेल,मजबूत होईल आणि आदरणीय पवारसाहेबांना अपेक्षित महिला संघटन हळुहळू उभे राहील, असे चित्राताई म्हणाल्या.

वेंगुर्ले तालुका-

वेंगुर्ल्याच्या सभेत आज वेंगुर्ल्याच्या शहराध्यक्ष म्हणून सौ.शोभा कोलगेकर यांची नियुक्ती करताना चित्रा वाघ यांनी केली. यावेळी बोलताना संघटनवाढीसाठी योग्य ती कामे करून आपली नियुक्ती योग्य ठरवावी अशी अपेक्षा चित्राताईंनी व्यक्त केली. आपला क्वांटिटीवर नाही, तर क्वालिटीवर विश्वास आहे. ५० जणींपेक्षा झो़कून काम करणाऱ्या ५ जणी आपल्याला हव्या आहेत, असे त्या म्हणाल्या. आता अंग झटकून काम करायला हवे. आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला भरभरून दिले आहे आता आपली वेळ आहे त्यांची उतराई होण्याची, त्यांना अपेक्षित संघटना उभारायची आहे, असे चित्राताई म्हणाल्या.

सावंतवाडी तालुका-

महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हे आदरणीय पवारसाहेबांचे उद्दीष्ट घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडी कार्यरत आहे.संघटनेत पसरलेली मरगळ झटकून टाका,परस्परांमध्ये संवाद ठेवा. बरं नाही खरं बोलायला शिका. आज राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा महिलांना आधार देण्यासाठी  आणि अशा घटना घडू नयेत म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी पुढे यायला हवे, असे चित्राताई म्हणाल्या.

दोडामार्ग तालुका-

८०% समाजकारण आणि २०% राजकारण हे आदरणीय पवार साहेबांचे सूत्र घेऊनच आपण काम करत आहोत. या वयातही साहेब लोकांच्या अडचणी सोडवताहेत,त्यांच्यासाठी धावताहेत ५०% आरक्षण देऊन साहेबांनी सत्तेच्या चाव्या आपल्या हातात दिल्या आहेत ते मुठभर महिलांनी पुढे येण्यासाठी नव्हे तर समाजातल्या शेवटच्या महिलेने ही आपल्या हक्क व अधिकारांच्या बाबतीत जागृत व्हावे या साठी पक्षाची ध्येय धोरणे आपल्याला त्या शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवायची आहेत, असे चित्राताई म्हणाल्या.

संबंधित लेख