राज्यातील आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचा डॉक्टर्स सेल सज्ज

24 Oct 2017 , 10:16:03 PM

डॉक्टर हा समाजातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. सेवाभावी अशा या पेशात काम करणाऱ्या डॉक्टरांना समाजासाठी एकत्र येण्याची संधी व राजकीय भान तसेच पाठिंबा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्षे करत आहे. या माध्यमातून राज्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्यांवर व समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्याशी निगडीत बाबींवर चर्चा होऊन, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करता येतो.
डॉक्टर सेल उभा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्व पक्षांनी त्याचे अनुकरण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर सेल हा सर्वात मजबूत डॉक्टर सेल असल्याचे वक्तव्य डॉक्टर्स सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी डॉक्टर सेलची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने डॉक्टरांसाठी असंख्य निर्णय घेतले. पण आजचं सरकार काही करताना दिसत नाही. जिल्हा रुग्णालयात योग्य सुविधा नसल्याने नाशिकमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला, शासनाच्या काही रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नाही, अनेक रुग्णालयात जागा रिक्त आहेत हा सगळा प्रकार या सरकारच्या हलगर्जीपणामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील डॉक्टर ग्रामीण भागात काम करू इच्छित नाही हे अर्धसत्य असल्याचे ते म्हणाले. परदेशात, दुर्गम भागात आपल्या देशातले डॉक्टर्स काम करतात पण नियुक्तीचा कारभार ढिसाळ असल्याने ग्रामीण ठिकाणी वेळेत डॉक्टर्सची नियुक्तीच होत नाही, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ स्थापन झाले मात्र त्याचे एकही मेडिकल कॉलेज नाही. शासकीय यंत्रणा योग्य नसल्याने लोक डॉक्टरांवर आपला रोष व्यक्त करतात. अनेक डॉक्टरांना मारहाण केली जाते. डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा आहे मात्र सरकारला डॉक्टरांना संरक्षण देण्यास अपयश आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या विधिमंडळात क्लिनिकल कायदा येणार आहे पक्षाच्या नेत्यांनी त्यात डॉक्टरांच्या बाजूने सुचना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आजच्या बैठकीत चर्चा केलेल्या मुद्द्यांचा पुढील निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समावेश असायला हवे असे वक्तव्य डॉक्टर्स सेलचे कार्याध्यक्ष डॉ. समीर दलवाई यांनी केले. जगात हंगर इंडेक्स मध्ये भारत १०० व्या स्थानावर घसरले आहे. देशात भूकबळींची व कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढत चालली आहे, ही गंभीर बाब आहे. अच्छे दिन नक्की कुणाला आले आहेत हा संशोधनाचा विषय झाला असल्याचे ते म्हणाले. सत्तापालट झाल्याशिवाय वैद्यकीय क्षेत्राची वाताहत थांबू शकत नाही. आपण खूप अभिमानाने सांगतो की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण मात्र निवडणूकांपूर्वीच्या काळात १०० टक्के राजकारण करायला हवं असे मत त्यांनी व्यक्त केले. बऱ्याच वैद्यकीय संघटना आज आहेत मात्र राष्ट्रवादीचे डॉक्टर सेल हे एक राजकीय व्यासपीठ आहे. राजकीय विचारधारेचे प्रशिक्षण डॉक्टरांना द्यायला हवे त्यामुळे त्याचा पक्षाला फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख