डॉक्टरांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय - शरद पवार

31 Oct 2017 , 10:55:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर्स सेलची महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठक मुंबईत संपन्न

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात डॉक्टर्स सेलची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टर सेलच्या कामाचे कौतुक केले. डॉ. घुले यांच्या संकल्पनेतून ही वैद्यकीय संघटना सुरू झाली असून त्यांच्या पश्चात त्यांचे सहकारी या सेलचे काम चांगले करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉक्टरांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आघाडी सरकार असताना डॉक्टरांना संरक्षण देण्याचा कायदा तयार केला गेला होता मात्र या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे ते म्हणाले. त्या कायद्यात काही कमतरता असल्यास डॉक्टर सेलकडे त्याबाबत सूचना कराव्यात, आपण त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले.

या सरकारने डॉक्टरांविषयी क्लेशकारक निर्णय घेतले. सामाजिक सेवा पुरवत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं असं मत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केलं. राज्यात नर्सेसची कमतरता आहे. योग्य प्रशिक्षण केंद्र उभारल्यास राज्यातील महिला या क्षेत्रात सेवा देऊ शकेल. आघाडी सरकारच्या काळात डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा आणला गेला होता. मात्र आज सरकार डॉक्टरांना संरक्षण देण्यात कमी पडत आहे. आज संपूर्ण देशच आजारी आहे. देशाला या आजारातून मुक्त करण्यासाठी योग्य विचार करणाऱ्या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. देशाला या आजारातून मुक्त करण्यासाठी २०१९ साली आपली भूमिका महत्त्वाची ठरेल त्या दृष्टीने प्रयत्न करा असे वक्तव्य त्यांनी केले.

समाजामध्ये डॉक्टरांचे स्थान खूप महत्वाचे आहे. भारत पोलिओमुक्त करण्यामध्ये डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. पण आज नॅशनल हेल्थ पॉलिसी कुठे चालली आहे हे पाहणे गरजेचे आहे असे वक्तव्य खा. सुप्रिया सुळे यांनी केले. पुढच्या पाच वर्षात डॉक्टर सेल काय करणार याचा एक कार्यक्रम सेलने तयार करावा. डॉक्टरांचं एक बिल संसदेत येणार आहे. डॉक्टर सेलने त्यावर रिसर्च करून एक ड्राफ्ट तयार करावा. मी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे करीन असे आश्वासन त्यांनी केले. जेनरिक औषधांबद्दल समाजात चांगल्या-वाईट प्रतिक्रिया आहे. त्यावरही चर्चा व्हायला हवी. डॉक्टर सेलमध्ये महिला जिल्हाध्यक्ष हे पद निर्माण करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

डॉक्टरांचा पेशा हा सेवाभावी आहे. समाजातील सगळ्या घटकांशी त्यांची नाळ जोडलेली असते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो याचा फायदा त्यांनी पक्षासाठी करावा असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. सामान्य माणसांप्रमाणे डॉक्टरांचेही असंख्य प्रश्न आहेत आम्ही हे प्रश्न सरकार दरबारी नेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर सेल हा सर्वात मजबूत सेल असल्याचे वक्तव्य डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले. १०८ ची अॅम्ब्युलन्स सेवा ही आघाडी सरकारच्या काळात आणली गेली. डॉक्टर सुरक्षा कायदा हा आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने डॉक्टरांसाठी असंख्य निर्णय घेतले. पण आजचं सरकार काही करताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासकीय यंत्रणा योग्य नसल्याने लोक डॉक्टरांवर आपला रोष व्यक्त करतात. डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा आहे मात्र सरकारला डॉक्टरांना संरक्षण देण्यास अपयश आल्याचे वक्तव्य त्यांनी केले. राज्याच्या विधिमंडळात क्लिनिकल कायदा येणार आहे पक्षाच्या नेत्यांनी त्यात डॉक्टरांच्या बाजूने सूचना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी डॉक्टर्स सेलतर्फे खा. शरद पवार यांना संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीसाठी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष हेमंत टकले, डॉ. समीर दलवाई, राज्यभरातून डॉक्टर्स व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख