मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटारडे - चित्रा वाघ

11 Nov 2017 , 10:04:03 PM

नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या लाभार्थ्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात केला होता. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहमुख गाव गाठले. त्यांच्यासोबत धमकीचा आरोप असलेल्या डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रदेश सचिव कामिनी जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसमोर लाभार्थी फुनाबाई पवार यांची भेट घेतली. आपल्या पदाधिकाऱ्यांनी धमकावले का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. त्यावर फुनाबाई पवार यांनी आपण यांना ओळखत नाही आणि त्यांनी धमकावले नाही, असे स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीची शहनिशा, खातरजमा न करता विरोधी पक्षातील महिला पदाधिकारीची बदनामी केली आहे. अशा पद्धतीने राज्यातील महिलांची बदनामी करणे हे राज्याच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यांचे सहकारी व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नुकतेच दारूच्या ब्रँडला महिलांचे नाव द्या, असे संतापजनक वक्तव्य केले होते. संपुर्ण राज्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गिरीश महाजन यांना चप्पल मारो आंदोलन केले. आता स्वत: मुख्यमंत्री अशा पद्धतीने विधाने करत आहेत. या घटना पाहता सत्ताधाऱ्यांनी राजकारण किती खालच्या पातळीवर नेले, हे लक्षात येत आहे. सत्ताधारी महिलांबाबत दाखवत असलेला कळवळा किती बेगडी आहे, हे आता राज्यातील जनतेच्या समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे कि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी थांबवावी तसेच निराधार व बिनबुडाच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

संबंधित लेख