राज्यातील पंधरा महापालिकांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्चा काढणार - संग्राम कोते पाटील

11 Nov 2017 , 10:50:42 PM

नियमित पाणी पुरवठा , स्वच्छता, बांधकामे नियमित करणे, शास्तीकर पूर्णपणे माफ करणे, मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी आणि रिंगरोड रद्द करावा अशा विविध मागण्यासाठी आणि शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 'जवाब दो' मोर्चा काढला. चिंचवड स्टेशनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. सिटी मॉल मार्गे हा मोर्चा पालिकेवर येऊन धडकला. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर आणि माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना संग्राम कोते-पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट केला. बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवड शहरावर त्यांचे अधिक लक्ष होते. शहरासाठी त्यांना मोठा निधी उपलब्ध करुन दिला होता. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता येऊन पाच महिने झाले. या पाच महिन्यात शहराची वाट लागली आहे. पुढील काळात राज्यातील पंधरा महत्त्वाच्या महापालिकांवर तेथील पायाभूत सोयी-सुविधा नीट पुरवल्या जाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख