भाववाढीसाठी शेतकरी अस्वस्थ होणारच, त्यांच्यावर बळाचा वापर टाळला पाहिजे - शरद पवार

22 Nov 2017 , 10:45:16 PM

चंद्रपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बोलताना कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधन यांनी केलेले आरोप भयानक स्वरुपाचे आहेत, असे ते म्हणाले. राज्य सरकारने त्याची दखल घेऊन योग्य चौकशी करावी. जर यात तथ्य असेल तर कारवाई करावी. पण जर हे सत्य नसेल तर अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत याबाबत खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले की सरकारने कर्जमाफीबाबतचा अध्यादेश सहा वेळा बदलला. त्यांच्या मी लाभार्थी जाहिरातीत ३४ हजार कोटी रु. कर्जमाफी ७० लाख शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, असे छापले आहे. तसेच शेतमालाला भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढले, असेही सकारात्मक वक्तव्य छापले आहे. राज्यकर्त्यांनी इतके मोठे असत्य वक्तव्य करु नये, यामुळे शेतकरी नैराश्यात जाऊ शकतो, असा इशारा पवार यांनी दिला.

शेवगाव येथे काल शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलीसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांबाबत वक्तव्य करताना शरद पवार म्हणाले की, भाववाढीसाठी शेतकरी अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण अशावेळी त्यांच्यावर बळाचा वापर टाळला पाहिजे. इतर विषयांवर बोलताना त्यांनी समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन यापेक्षा गडचिरोलीपासून सावंतवाडी असा मार्ग केला तर त्याची उपयुक्तता सबंध राज्याला होईल, असे मत व्यक्त केले.

संबंधित लेख