राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर 'जवाब दो' विराट मोर्चा

30 Nov 2017 , 06:54:26 PM

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, सोलापूर महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे, दोन मंत्री, एक खासदार४९ नगरसेवकमहापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती व सभागृह नेतासुद्धा भाजपचाच असताना सोलापूरचा विकास होत नाही ही शोकांतिका आहे. दोन देशमुखांच्या गटबाजीत सोलापूरचा विकास खुंटला आहे. यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. या दोघांच्या भांडणामुळे सोलापूरचा विकास होत नाही आणि निधीही आणला जात नाही त्यामुळे आता सोलापूरच्या विकासासाठी दोन्ही देशमुखांच्या छाताडावर बसण्याची वेळ आली असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला.

विस्कळीत पाणीपुरवठा, डेंग्यू-स्वाईन फ्ल्यूचे थैमान,खराब रस्ते,स्मार्ट सिटीचा उडालेला बोजवारा,कचऱ्याची समस्या, मोकाट जनावरे,भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर,मनपातील महत्वाची रिक्त पदे,परिवहन कामगारांच्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या पगार, गाळे भाडेवाढीचा लटकलेला निर्णय, शौचालयांअभावी महिलांची होणारी कुचंबणा अशा विविध प्रश्नांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेवर विराट 'जवाब दो' मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मनपासमोर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी कोते - पाटील बोलत होते.

या मोर्चाची सुरुवात चार हुतात्मा पुतळा येथून दुपारी बारा वाजता झाली. या मोर्चा दरम्यान "भाजप सरकार हाय हाय". "झुटे वादे झुटे बोल भाजप 'तेरी खुल गई पोल". "मोदी- शहा खुशहाल जनता बेहाल" अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. मोर्चातील एका शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि शहरवासियांना येत असलेल्या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा केली.

कोते - पाटील म्हणाले की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि लोकांना फसवायचे हे एकमेव धोरण भाजपने आखले आहे. त्यामुळे सोलापूरचे विकासाचे प्रश्न न सुटल्यास आगामी काळात यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतानाच आयुक्तांनाही कोते - पाटील यांनी अल्टिमेटम दिला. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुमारे एक लाख युवकांचा मोर्चा मंत्रालयावर काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, युवकचे जिल्हा निरीक्षक प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष विक्रांत मानेराजन जाधव,महिला प्रदेश सचिव वैशाली गुंड, अल्पसंख्यांकचे अध्यक्ष राजू कुरेशी यांच्यासह पक्षाचे सोलापुरातील नेते आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख