‘झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल’; आरंभ सभेत राष्ट्रवादीने सरकारचा घेतला खरपूस समाचार

04 Dec 2017 , 01:52:21 AM

या सरकारने तीन वर्षात राज्यातील जनतेची फक्त फसवणूक केली आहे. त्यांना जागे करण्यासाठी हे #हल्लाबोल आंदोलन आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना ही सर्वात चांगली योजना आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण या योजनेअंतर्गत एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे ही योजना सर्वात वाईट योजना आहे, अशी घणाघाती टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे केली. हल्लाबोल आंदोलनाच्या आधी यवतमाळ येथे आरंभ सभा घेण्यात आली. या सभेस संबोधित करताना ते बोलत होते.

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजीया खान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, अनिल देशमुख, गुलाबराव पाटील, संदीप बाजोरिया, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, किसान सेलचे राज्यप्रमुख शंकर अण्णा धोंडगे, आमदार विद्या चव्हाण आणि पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सभा सुरू होताना सर्वांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

तटकरे पुढे म्हणाले की महिलांवरील अत्याचार आज वाढले आहेत. तरूणांना रोजगार नाहीत अशी परिस्थिती आज आहे. या मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला जागे करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. विधानभवनावर जो हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहेत, त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. परिवर्तनाच्या या लढाईत सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात तीन वर्षांपूर्वी निवडून आलेले भाजप सरकार नीट काम करत नाही, म्हणून आम्हाला ही हल्लाबोल यात्रा काढावी लागत आहे. या आधीही मा. शरद पवार साहेबांनी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. आजही शेतकऱ्यांवर तेव्हासारखी बिकट परिस्थिती ओढावली आहे. त्याविरोधात ही पदयात्रा आहे, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले.

कीटकनाशक फवारणी करताना प्रतीक्षाच्या वडिलांचा मृत्यू झाला. कोणती चूक नसताना प्रतिक्षा आणि तिच्या कुटुंबावर जो अन्याय झाला, त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत आपला पक्ष अशा लोकांबरोबर कायम आहे, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेला दिला. त्या म्हणाल्या, फवारणीच्या प्रकरणीची चौकशी झाली. त्या चौकशीत विषबाधा झाली नाही, असा अहवाल देण्यात आला. मुख्यमंत्री गुपचूप आले आणि निघून गेले. असा पळपुटेपणा त्यांनी का केला?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
 मुख्यमंत्री म्हणाले होते की शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’ देण्यात येईल, पण एकाही शेतकऱ्याला किट मिळाला नाही. बोंड आळीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. त्यांचे पंचनामे करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज आल्यावर शेतकरी रांगा लावून उभे राहिले. त्यात सरकारने भारनियमन सुरु केले. मग शेतकरी फॉर्म कसा भरणार? या सरकारचा कारभार पारदर्शक आहे, हे मला मान्य आहे. कारण यांचा कारभार दिसतच नाही, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार फक्त खोट्या जाहिराती करत आहे. मी लाभार्थी या शब्दाला माझा अक्षेप आहे. ते हक्कार्थी आहेत कारण जनतेची मदत करणे ही सरकारची जबाबदारी असते. डिजिटल गावची जाहिरात फोल ठरली. त्यामुळे किती खोटे बोलावे हे या सरकारकडून शिकले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली. २०१६ सालचा क्राईम रिपोर्ट सरकारने ऑनलाईन दिला नाही. त्यामुळे राज्यात किती गुन्हेगारी वाढली, हे सांगणे कठीण आहे. तीन वर्षात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. अशा वेळी ३०२चा गुन्हा कोणावर दाखल करावा, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असे सांगत सरसकट म्हणजे १००% कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, असेही सुळे म्हणाल्या.

विदर्भाच्या जनतेने भाजपला ठासून मत दिले, पण लोकांच्या पदरी निराशा आली. कापूस, सोयाबीन यासारख्या शेतमालाला भाव दिला जात नसेल, तर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आपल्या हल्लाबोल करावा लागेल. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या ठिकाणी झाल्या आहेत, म्हणूनच ‘हल्लाबोल’ पदयात्रा विदर्भातून काढली जात आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. १५ लाखांचे स्वप्न दाखवले. लोकांना ‘जनधन योजने’मार्फत बँकांमध्ये खाते उघडायला सांगितले. पण एकाच्याही खात्यात अद्याप पंधरा लाख रुपये जमा झाले नाहीत. लोकांना आजही आशा आहे की, किमान २५ हजार रुपये तरी त्यांच्या खात्यात जमा होतील, मी खात्रीने सांगतो की एक रुपयाही खात्यात जमा होणार नाही, असेही ते म्हणाले.

लोकांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे आणि मोदी सरकार स्वच्छ भारत अंतर्गत शौचालय बांधत आहेत. मुळात लोकांना खायलाच मिळाले नाही तर हा खटाटोप काय कामाचा? ‘खायेगा इंडिया; तभी तो जाऐगा इंडिया!’ अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल, असे सांगितले. पण अजूनही कोणाची कर्जमाफी झाली नाही. २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन या सरकारने दिले, पण अजूनही बहुतांश लोकांना रोजगार मिळाला नाही. नोकरभरती केली जात नाही, सरकार सगळीकडे ‘कॉन्ट्रॅक्ट बेस’वर काम करत आहे. लोकांना पुढे रोजगार मिळेल की नाही, याबाबतही शंका आहे, असेही मुंडे म्हणाले.

सरकार शेतकरी कर्जमाफी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. निर्णय होऊन सहा महिने झाले, तरी सरकारला कर्जमाफीचे पैसे वर्ग करता आलेले नाहीत. आदरणीय शरद पवार साहेब यांनी कोणत्याही अडचणींशिवाय कर्जमाफी दिली होती. पण या सरकारला केवळ बँका सांभाळायच्या आहेत, अशी बोचरी टीका विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. विदर्भातील नेत्याकडे महत्वाची पदे असून सरकार विदर्भात काहीच करत नाही. विदर्भात कोणत्याही योजना आणल्या जात नाहीत, ही गोष्ट खेदजनक आहे, असे ते म्हणाले. तसेच, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की ‘रस्ते सोडा, पत्रकारांना मॅनेज करा’, यावरून यांना फक्त प्रसिद्धी हाव आहे, हे सिद्ध होते अशी टीकाही त्यांनी केली. नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी झाली आहे. आपल्या पक्षातील लोकांना पाठीशी घालायचे आणि इतरांना धमक्या द्यायच्या, असे काम भाजप करत असल्याचा आरोप पाटील यांनी केली.

संबंधित लेख