शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या; मग टीका करा हल्लाबोल आंदोलनावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे आव्हान

04 Dec 2017 , 01:54:46 AM

कळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आम्ही दिल्लीत ‘जुमले की सरकार’ म्हणतो. नवीन काहीच त्यांच्याकडे नसते. तेच तेच जुने भाषण ते नेहमी करतात. फक्त ‘जुमला’ दाखवला जातो आणि आता मुख्यमंत्र्यांनाही त्यांचीच सवय लागली आहे. कारण  ‘खोटे बोला पण रेटून बोला’, असा या सरकारचा कारभार आहे. आणि म्हणूनच मी आजही म्हणते कि हे सरकार ‘खोटारडे सरकार’ आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कळंबच्या इंदिरा चौक येथील सभेत केली.

यावेळी विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार विद्या चव्हाण, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजीया खान, माजी आ. संदीप बाजोरिया, आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तर फडणवीस यांनाही लोक चोरांचे मुख्यमंत्री म्हणतील - धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांच्या पोटात दुखू लागले आहे. आम्ही मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासह विधिमंडळात उघड केले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीही केलेले नाही. हे असेच चालू राहीले तर एक दिवस लोक मुख्यमंत्र्यांनाही चोरांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखतील, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.

संबंधित लेख