पक्ष भुजबळ यांच्या पाठीशी आहे- सुनिल तटकरे

14 Jan 2016 , 03:21:30 PM

आपण शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. "संजय राऊत हे स्वतः पत्रकार आहेत, सामनाचे संपादक आहेत. त्यांच्या पाहण्यात काही कागदपत्रे, एफआयआर आले असतील आणि त्यांनी अभ्यास करून काही निष्कर्ष नोंदवले असतील, तर त्यांचे मत त्यांनी मांडले आहे. परंतु या संदर्भात त्यांची माझी काही चर्चा झालेली नाही किंवा मी शिवसेनेत जाण्याबद्दल पण काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या पत्राला राजकीय संबंध कुठेही जोडण्याचे कारण नाही," अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पत्र १६ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आले. ते पत्र प्राप्त झाल्याचा शिक्का त्यावर आहे. त्या पत्रामध्ये मराठी अधिकाऱ्यांवर कसा अन्याय होतो आहे, हे सांगितलेले आहे. मंत्रिमंडळातील प्रपोजल्स तयार होतात, ते अधिकारीच तयार करतात. त्यात काही चुकीचे झालेले आढळत नाही. हे प्रकरण कॅबिनेट समोर मांडले तेव्हा मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तिथे उपस्थित होते. मुख्य सचिव आणि अनेक सचिव तिथे होते. भ्रष्टाचारविरोधी पथकाला काही चुकीचे वाटत असल्यास तेव्हा उपस्थित असलेल्या इतर सचिवांवर देखील गुन्हा दाखल करायला हवा, असं मत पत्राच्या शेवटच्या उताऱ्यात मांडलेले आहे.

आपल्यावरील गुन्हा खरा असेल तर इतर सचिवांची नवे सुद्धा एफआयआर मध्ये टाकायला हवीत. तसे झाले असते तात्कालीन मुख्यमंत्र्यांसह ८-१० मंत्र्यांवर, १०-१२ मुख्य सचिवांवर गुन्हा दाखल करावा लागला असता असे भुजबळ यांनी सांगितले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भुजबळांनी काहीतरी घोटाळा केला असे ठरवून त्याच विभागातील अधिकाऱ्यांवर काल्पनिक गुन्हे दाखल करणे ही कृती न्यायिक नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी आहे, असे पत्रक संजय राऊत यांनी लिहिले आहे. ते मुख्यमंत्री कार्यालयात १६ डिसेंबरला पोहोचले आहे.  

"२-३ वर्षांपासून किरीट सोमय्या माझ्यावर सातत्याने आरोप करत असून हे सर्व राजकीय आरोप आहेत, असत्य आहेत, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी केले आहे. सोमय्या कोर्टात गेल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली, पण प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर अधिक वक्तव्य करणे टाळले," असे ते पुढे म्हणाले. पण म्हणून ते सगळे आरोप खरेच आहेत असे नाही, किंवा आम्ही आरोपी आहेत असेही नाही. आम्ही कोणतेही  निर्णय घेतलेले नाहीत, आमची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री आणि ८-१० मुख्य सचिवांसमोर स्वच्छपणे मांडली होती. कोणीतीही गोष्ट मंत्रिमंडळापासून लपवली नाही. त्यामुळे या प्रकरणाची न्याय्य भूमिकेतून चौकशी व्हावी, कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी व्हावी हीच अपेक्षा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या पत्राबाबत आवश्यक ते स्पष्टीकरण मीडियासमोर केलेले आहे. भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

संबंधित लेख