पंतप्रधान मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकशी संबंध जोडणे लज्जास्पद : शरद पवार

13 Dec 2017 , 06:30:18 PM

- विरोधकांवर दमदाटीचा प्रयत्न कराल तर सरकार उखडून फेकू, हल्लाबोल-जनआक्रोश मोर्चातून शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे आरोप केले. देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परदेशी ताकदीला प्रवेश करू दिला जात नाही, ही आपल्या देशाची परंपरा स्वतः पंतप्रधान मोडतायत याचे दुःख वाटते. देशहिताचे नसलेले असे आरोप करताना त्यांना शरम वाटली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे), सपा, माकप या विरोधी पक्षांच्या एकत्रित ‘जनआक्रोश - हल्लाबोल’ मोर्चात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे सर्व आमदार, राज्यभरातले पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे, राज्याचे आणि देशाचे विविध गंभीर प्रश्न आहेत. पण देशाचे नेतृत्व करणारे ते प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवून ती चर्चा दुसरीकडे भरकटवत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. यवतमाळपासून पदयात्रेत सहभागी झालेल्या पदयात्रींनी जनआक्रोश काय असतो, ते दाखवून दिले. बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी झोपलेल्या सरकारवर राष्ट्रवादीतर्फे ’हल्लाबोल’ करण्यात आला होता. तो जनतेने यशस्वी केला. त्यामुळे या पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे पवार साहेबांनी आभार मानले. हा #हल्लाबोलसंपलेला नाही आणि सत्ता परिवर्तन होईपर्यंत हा हल्लाबोल थांबणार नाही, असा इशारा यावेळी पवार साहेबांनी दिला.

साडे तीन वर्षे झाली, कर्जमाफीचा पत्ता नाही. आत्महत्या झाल्या, तरी सत्ताधाऱ्यांच्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही. जर कर्जमाफीची पूर्ण रक्कम खात्यात जमा होत नसेल, तर सरकारची कोणतीही देणी शेतकरी देणार नाही, असे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

आम्ही १५ वर्षांत काय केले, असा प्रश्न मुख्यमंत्री नेहमी विचारतात. या प्रश्नाचे उत्तर आजच्या ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये मिळेल. शेतीसंबधी संशोधन करणाऱ्या जागतिक संघटनेने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि मी कृषीमंत्री असताना देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन होऊन करोडो देशवासियांची भूक भागली, असे पत्र लिहिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निदान वर्तमानपत्र तरी वाचावेत म्हणजे त्यांना सत्य कळेल, असा टोला पवार यांनी लगावला. जनतेने राज्यप्रमुख म्हणून राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. पण दमदाटी करणे, विरोधकांना तुरुंगात टाकण्याची भाषा ते वापरत आहेत. त्यामुळे सरकार अशी भाषा वापरत असेल तर हे सरकार उखडून टाकण्याची ताकद बळीराजात आहे, याबद्दल मला शंका नाही, असा इशाराच पवार यांनी सरकारला दिला.

भाजपच्या सरकारने सत्तेत आल्यापासून जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ‘मुख्यमंत्री म्हणाले होते की, योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ. त्यावेळी विरोधी पक्ष आक्रमक झाले. सरकारला झुकावे लागले आणि कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला. पण दुर्दैवाने ती कर्जमाफी फसवी निघाली, असे ते म्हणाले. आम्ही हल्लाबोल मोर्चा काढला, काँग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढला, म्हणूनच सरकार जागे झाले आणि बोंड आळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आज आपण एकत्र झालो आहोत ते या सरकारला पदच्च्युत करण्यासाठी, आपला लढा असाच पुढेही चालू ठेवूयात, असा विश्वास यानिमित्त त्यांनी व्यक्त केला. आदरणीय साहेबांचा वाढदिवस असतानाही, प्रकृती ठिक नसतानाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हल्लाबोल करण्याकरिता साहेब आज उपस्थित राहिले. त्याबद्दल तटकरे यांनी सर्वांच्या वतीने शरद पवार साहेबांचे आभार मानले आणि ऋण व्यक्त केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र पाहून फडणवीस सरकारची झोप उडाली असणार. ज्या गुजरातमध्ये मोदी यांचे वर्चस्व होते, तिथेही शेतकरी महाराष्ट्रापेक्षा जास्त हवालदिल झाला आहे. शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे देशाचेच शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. गुजरातमध्ये जनतेच्या मनात भाजपबद्दल रोष आहे, त्यामुळे तेथे सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटायची गरज नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बहुतांशी विदर्भाचे, पण तरी विदर्भ दुर्लक्षित आहे. भूमिपूजन झालेले अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच इतर मित्रपक्षांनी साथ दिली तर २०१९ मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात, तीन वर्षात तब्बल १५०० हून अधिक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ या सरकारने आणल्याबद्दल सरकारवर तोफ डागली. हे मुख्यमंत्री ‘फडणवीस आहेत की फसवणीस’ असा टोला मुंडे यांनी लगावला. सभागृहात जेव्हा आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडायचो, तेव्हा मुख्यमंत्री म्हणायचे की ते पाच पिढ्यांपासून शेतकरी आहेत. पण मुख्यमंत्र्यांना पाहून खरेच ते शेतकरी वाटतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने निवडणुकीआधी विविध आश्वासने दिली. धान्याला तीन हजार रुपये हमीभाव देऊ. कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळवून देऊ, असे भाजपने सांगितले; पण काहीही फायदा झालेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून राज्य सरकारला सहा महिन्यांच्यावर कालावधी लोटला, पण अद्याप कोणालाही कर्जमाफी मिळालेली नाही, अशी खंत माजी मंत्री अनिल देशमुख व्यक्त केली. त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित लेख