तीन वर्षांत येथे विकासाचा पाळणा हाललाच नाही - अजित पवार

20 Jan 2018 , 05:47:45 PM

मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज बीडमधील गेवराई येथे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. ती लाट इतकी जबरदस्त होती की, ज्यांना नगरसेवक होता आले नसते, असे लोकही आमदार, खासदार झाले. पण तीन वर्षाच्या काळात येथे विकासाचा पाळणा हालला नाही. त्यामुळे या सरकारला तीन वर्षात विकास का करता आला नाही, याचा विचार सरकारने करायला हवा.

फक्त मागच्या सरकारवर आरोप करून चालणार नाही. आघाडी सरकारच्या काळात तर कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली होती. या मुख्यमंत्र्यांना मात्र कोणताच प्रश्न सोडवता आला नाही. मी मुख्यमंत्री बोलतोयया कार्यक्रमासाठी कोटीच्या कोटी रुपये खर्च केले जातात. जनतेच्या पैशांचा चुराडा मोदी जसे केंद्रात करतात, तसेच मुख्यमंत्री राज्यात करतात, असा आरोप त्यांनी केला.

लोकांना हे सरकार पटत नाही, म्हणूनच तरुण, महिला, सर्वच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. रक्षकच भक्षक बनत आहेत. ही परिस्थिती आणायची असेल, तर आपल्या विचारांचे सरकार यायला हवे आणि यासाठीच आपण या हल्लाबोल आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

या सरकारच्या फसव्या धोरणाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत ऑनलाईनचा आग्रह धरणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थाने सत्तेतून ऑफलाईनघालवण्याची आता वेळ आली आहे. कापसाची ३५ लाख हेक्टर शेती बोंडअळीमुळे प्रभावित झाली, मात्र सरकारने एका रुपयाचीही मदत केली नाही.

आ. अमरसिंह पंडित सभेत बोलताना म्हणाले की भाजप सरकारच्या धोरणामुळे सर्वात जास्त हानी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. मराठवाडा हा खरीपाचा विभाग म्हणून ओळखला जातो. बोंडअळीमुळे कापूस पिक उध्वस्त झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर पुढच्या वर्षी खरीपाची शेती कशी करायची? हा प्रश्न आहे. पण सरकारला याचे गांभीर्य नाही.

बीटी बियाणांचा कार्यकाळ संपलेला आहे, याची माहिती आम्ही विधिमंडळात दिली होती. मात्र सरकारने हालचाल केली नाही. म्हणूनच आज शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांची अशी चेष्टा करणाऱ्या सरकारला २०१९च्या निवडणुकीत जनता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आ. विद्या चव्हाण सभेत बोलताना म्हणाल्या की हे सरकार वांझोटे आहे. शेतकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न यांना माहिती नाहीत. त्यामुळे सरकारकडून काही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. कारण, या सरकारला फक्त धनदांडग्यांचा कळवळा आहे आणि अशा पद्धतीच्या सरकारला वेळीच खाली खेचण्याची गरज आहे.

मुख्य प्रवक्ते नवाब मलिक सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले की लोकांमध्ये असंतोष नाही असे भाजपचे प्रवक्ते सांगतात. पण खरी परिस्थिती वेगळी आहे. अच्छे दिनम्हणत हे सरकार सत्तेवर आले. आता लोक भाजपला विचारत आहेत की, अच्छे दिन कुठे आहेत? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तर म्हणतात की अच्छे दिनहा एक जुमला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, ‘अच्छे दिनहीगले की हड्डी बन गयी है’. इतक्या नीच पातळीची फसवणूक या सरकारने लोकांची केली आहे. भाजप हा शेठजींचा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, हे जगजाहीर आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, हे सरकार फक्त शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसांना फसवण्यात यशस्वी झाले आहे. २०१९ ला ज्या वेळी निवडणुका लागतील, तेव्हा जनतेचा सरकारच्या विरोधात किती राग आहे ते स्पष्ट होईल. या सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहे पण विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नाही. विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. परीक्षा केंद्रावर जाण्यास विद्यार्थ्यांना मिनिटभर उशीर झाला तरी त्यास परीक्षेला बसू देणार नाहीत असा नियम या सरकारने काढला. हा कुठला नियम आहे? असा सवाल करत हे सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी आंदोलन छेडणारे भाजपचे बीडचे नेते पाशा पटेल हे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांना त्यांचाच मागणीचा विसर पडला, अशी कोपरखळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मेहबूब शेख यांनी मारली.

या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी बीड जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे-शिक्षक आमदार, आ. रामराव वडकुते, माजी आ. प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, युवानेते संदिप क्षीरसागर, माजी आ. उषाताई दराडे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फड, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, माजी आ. संजय वाकचौरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे, गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बीड युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख