सरकारची मानसिकता म्हणजे ‘मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला!’- सुनिल तटकरे

20 Jan 2018 , 05:53:19 PM

भाजप-सेनेच्या या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची मागणी आहेच, पण त्याच बरोबर मागच्या चार वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांचे वीज बील थकित आहे, त्यांचेही वीज बिल माफ झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड येथे केली. हल्लाबोल आंदोलनातील सभेत ते बोलत होते.

या सरकारची धोरणे अत्यंत फसवी आहेत. जनतेच्या पैशाचा अपव्यय या सरकारकडून केला जात आहे. 'मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला' या म्हणीप्रमाणे भाजपचे हे निर्दयी सरकार लोकांच्या घामाच्या पैशाचा वापर स्वतःच्या जाहिरातीसाठी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला ज्याप्रकारे जोरदार पाठिंबा मिळत आहे, ते पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता हे वारे वाहू लागले असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

या वेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यातून लाखो लोक रोजगारासाठी बाहेर जातात. हा प्रश्न गंभीर आहे. पण याबाबत प्रशासन आणि शासन काहीच का करत नाही? जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात काय करतात? हे सरकार जिल्ह्याचा विकास न करता वेगळ्याच विषयावर राजकारण करत आहे. पण आम्हाला माहीत आहे की बीड जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. भाजपच्या फसव्या जाहिरातबाजीमुळे २०१४ च्या निवडणुकांत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली नाही. पण २०१९ च्या निवडणुकीत या नाकर्त्या सरकारविरोधात जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरात होत आहेत. 'हल्लाबोल'च्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की उरलेल्या काळात नीट काम करा, नाहीतर जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद असूनही विकासाच्या बाबतीत जिल्हा खूप मागे आहे. पण बीड शहराला संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा युवानेता मिळाला आहे. बीडचा विकास साधण्यासाठी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना पुढे घेऊन पक्ष काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, ऑनलाईन कर्जमाफीचा शेतक-यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही, मात्र हे काम करणा-या 'इनोव्हेव' कंपनीच्या खात्यावर १०० कोटी रुपये जमा झाले आणि जाहिरातीवर ३०० कोटींची उधळपट्टी या सरकारने केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

या सोबतच मुख्य प्रवक्ते नवाब मलिक व युवानेते संदिप क्षिरसागर यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अमरसिंह पंडित, आ. विद्या चव्हाण, आ. रामराव वडकुते, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मेहबूब शेख, माजी आ. उषाताई दराडे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फड, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नगराळकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख