औरंगाबाद येथील सभेसाठी पूर्वतयारी बैठक

30 Jan 2018 , 11:19:37 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा #हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०१८ रोजी औरंगाबाद येथे एका विराट सभेच्या माध्यमातून होणार आहे. या सभेकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनाच्या पूर्वतयारीची बैठक आज औरंगाबाद येथे पक्षाचे वरिष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

हल्लाबोल यात्रेचा पहिला टप्पा यवतमाळ ते नागपूर अशा १५३ कि.मी. पदयात्रेने पूर्ण झाल्यानंतर १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत भव्य सभा झाली होती. दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात २६ तालुक्यात राष्ट्रवादीच्या #हल्लाबोल सभा संपन्न झाल्या. सर्व सभांना शेतकरी, कामगार, तरूणांनी उत्स्फूर्त, अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. सरकार विरोधात उसळलेला हा असंतोष आता ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे दिसेल.

या बैठकीला औरंगाबाद जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष काशीनाथ कोकाटे, इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख