८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आदरणीय शरद पवार यांचे भाषण

18 Jan 2016 , 12:36:43 PM


पिंपरी-चिंचवड येथे संपन्न होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आदरणीय शरद पवार यांचे स्वागतपर भाषण-

पुण्यनगरी आणि देहू-आळंदी या संतनगरींच्या मध्यस्थानी वसलेल्या,श्रीमोरया गोसावींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात संपन्न होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.

मागील वर्षी पंजाबमधील घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहून मी हॅट्ट्रिक साधली होती. आणि या वर्षी सलग चौथ्यांदा हजेरी लावून संमेलनाच्या व्यासपीठावर लागोपाठ उपस्थित राहण्याच्या विक्रमात आणखी भर टाकली असे मला वाटते. माझी राजकीय व सामाजिक कारकीर्द ज्या परिसरात बहरली त्या उद्यमशील परिसरात मी आपणाशी संवाद साधण्यासाठी उभा आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे.

या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली तरी जाणवेल की, या संमेलनात अनेक विक्रम प्रस्थापित होतील. हे विक्रम संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांच्या संख्येचे असतील, भेट देणाऱ्या चाहत्यांचे असतील वा पुस्तक विक्रीचे असतील. संमेलनात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखकांचे अनुभव, गुलजारांच्या गुजगोष्टी एकाच मंडपात ऐकण्याची रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. याशिवाय साहित्यजगतातील अनेक विषयांना स्पर्श करणारे कार्यक्रम योजिले असल्याचे दिसून येते. इतक्या भरगच्च व दर्जेदार कार्यक्रमांच्या संयोजनाबद्दल मी स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील यांचे मी अभिनंदन करतो.

पुण्याचा हा सारा परिसर आपण लक्षात घेतला तर त्याला एक प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे, असे लक्षात येईल. ही परंपरा आध्यात्मिक,सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक विकासाची आहे. इथे इतिहास घडला, संतवाणी घुमली, शेतीतली आधुनिकता निर्माण झाली, उद्योग बहरले आणि गेल्या काही दशकात पिंपरी-चिंचवड हे सर्वांगीण आधुनिकतेचे महत्त्वाचे केंद्र बनले.बदलत्या काळाबरोबर जीवनात जी जी आव्हानं निर्माण झाली आणि ज्या प्रकारच्या बदलांची गरज निर्माण झाली, ती या परिसराने ओळखली,जाणली आणि तसे बदल उभे करत हे शहर पुढे जात राहिले आहे. काळाशी संवाद करत देशाच्या गतीशी आणि विश्वगतीशी ते नाते सांगते आहे. या परिसराशी माझा जो दीर्घकालीन संबंध आहे तो मला गौरवास्पद वाटतो.अशा या बहूगुणी नगरीत आज साहित्य संमेलन भरते आहे, ही मला विलक्षण आनंद देणारी घटना आहे.
साहित्य संमेलन हा शब्दांचा,साहित्याचा आणि ते साहित्य निर्माण करणाऱ्या सर्जनशील मनांचा महोत्सव आहे. साहित्यनिर्मिती ही सुसंस्कृत समाजात घडणारी एक अखंड अशी प्रक्रिया आहे. साहित्य निर्माण होते-केले जाते,त्यामागे व्यक्त होण्याची,आपल्या भावना,आपले विचार,आपल्या कल्पना साकारण्याची इच्छाशक्ती मोठी असते. मी म्हणेन की, जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव,निसर्गाचा अनुभव,सामाजिक-सांस्कृतिक अनुभव यांचा लेखकाच्या मनावर जो काही संस्कार होतो,त्यातून साहित्याची उपजवू भूमी सिद्ध होते. या भूमीच्या गर्भात व्यक्त होण्याची आपल्याला प्रेरणा होते त्यातूनच साहित्याचा जन्म होतो. सहजीवन,सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्यनिर्मितीला प्रेरणा देणारी तीन सूत्रे आहेत असे मला वाटते. स्वत:चाअनुभवदुसऱ्यालासांगण्याची,दुसऱ्याचं दु:ख आपलंसं करून घेण्याची, स्वत:च्या आनंदात इतरांना सामील करून घेण्याची आणि विश्वाचे आर्त जाणण्याची अमोघ कला म्हणजे साहित्यकला आहे, असे मी मानतो.

शेजारच्या माणसाला जगण्याचं बळ देणारी,त्याला जीवनाचा पीळ उलगडून दाखवणारी,त्याला नवा आत्मविश्वास देणारी आणि जीवनावरील प्रेमाला गतिमान करणारी साहित्यकृती अक्षरश: कुठेही जन्म घेऊ शकते. मग आपल्याकडील कप्पेबंद संस्कृतीत अशा साहित्यकृतीला तुम्ही दलित, आदिवासी, भूमिहीनांचे साहित्य , स्त्रीवादी साहित्य,मुस्लीम साहित्य किंवा जैन साहित्य असे कोणतेही लेबल लावा. त्याचं जन्मजात तेज लपून राहणार नाही. त्या त्या साहित्यकृतीतून उसळणारे संवादाचे धुमारेकुणीही नष्ट करू शकणार नाही. मला नेहमी असं वाटतं आलं आहे की, ज्या समाजातले सर्व वर्ग लिहिते असतात त्या समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी, आदर यांचा आलेख चढता दिसतो.समाजातील अनेक वर्गातून निर्माण होणारे साहित्य मिळून जर मराठी साहित्याचा पैस विस्तारला जात असेल तर ते संवादाचे चिन्ह मानावे लागेल. अनेक वाद्यांच्या मेळातून जशी एक सिम्फनी रसिकाला साद घालते तशी साहित्याची एक सिम्फनी निरंतर सिद्ध होत राहावी असं मला वाटतं.

मराठी साहित्यिक आणि त्यांचं साहित्य ही महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब समजली जाते. देशातील आणि जगातील साहित्यविश्वात मराठी साहित्यकृतींबद्दल आणि साहित्यिकांबद्दल नेहमीच एक कुतूहल असतं.आपल्याराज्यातील माणसांचं,विचारांचं,प्रगतीचं प्रतिबिंब आपल्या साहित्यकृतींमधून पाहायला मिळतं.

आजच्या वेगवान जागतिकीकरणाच्या युगात माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण विश्व जवळ येत चाललंय. 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' हे शेकडो वर्षांपूर्वी सांगणाऱ्या संत ज्ञानदेवांच्या वैभवशाली परंपरेतल्या आपल्या आजच्या साहित्यिकांनी हे जागतिकीकरण समर्थपणे स्वीकारलेलं दिसतंय, असं मला आनंदाने नमूद करावंसं वाटतं. ज्वलंत विषयांना भिडण्याची तयारी आजच्या तरुण लेखकांमध्ये प्रकर्षाने आढळून येते. आसाराम लोमटे, विश्रामगुप्ते, अवधूत डोंगरे, किरण गुरव, वीरा राठोड, बालाजी मदन इंगळे, वैभव छाया, मनस्विनी लता रवींद्र,कविता महाजन, जयंत पवार, सचिन परब, गणेश मतकरी हे आणि ह्यांच्यासारखे अनेक साहित्यिक आज घडताना दिसतायत हे मराठीसाहित्यसृष्टीच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण आहे. दलित साहित्यामध्येसुद्धा स्वागतार्ह बदल होत आहेत.

आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या सृजनशील साहित्यिकांनीप्रसृत केलेलं साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे मात्र निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यासाठी प्रकाशन व्यवसायाला नवी दिशा मिळणं फार महत्त्वाचं आहे.प्रसिद्धी माध्यमांचा खुबीने वापर करत हा व्यवसाय भरभराटीला आणण्यासाठीप्रयत्न करायला हवेत. प्रकाशक आणि लेखक ह्यांच्या व्यवहारात पारदर्शकताअसणं, विपणनाचे नवीन मार्ग शोधणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं.नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 'ग्रंथ तुमच्या दारी' हा उपक्रमराबविला जातो. अतिशय कल्पकतेने अशा पद्धतीचे उपक्रम राबवले तर आपण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचू शकतो.

नाट्यपरिषदेने ह्या वर्षी बालनाट्य संमेलन आयोजित केलं होतं. बालनाट्यकिंवा बालसाहित्य ह्या गोष्टींना चालना देणं हेही महत्त्वाचं आहे. आमच्यालहानपणी आम्हाला निरनिराळी पुस्तकं वाचण्याची सवय लागली. त्यामुळेच ही वाचनसंस्कृती आजही आमच्या पिढीत टिकून आहे. अशीच वाचन संस्कृती पुढच्यापिढीतही जाणीवपूर्वक रूजवायला हवी.संमेलनातबालगोपाळासांठी कार्यक्रम आहेत याचा आनंद वाटतो.

'सोशल मीडिया' हा आजच्या युगातला परवलीचा शब्द आहे. ह्या नवीन व्यासपीठांचावापर परिणामकारक रीतीने करता येईल. फक्त ह्यात काही गोष्टींचं भानबाळगायला हवं. केवळ 'व्यक्त' होणं आणि साहित्यातील 'अभिव्यक्ती' ह्या दोनवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपले व्यक्तिगत मत किंवा अनुभव निव्वळमांडणं तसंच प्रवासवर्णनं केवळ शब्दांकित करणं हे कौतुकास्पद आहे. पण एखादीसाहित्यकृती निर्माण करणं ही त्यापुढची पायरी आहे. आपल्या आयुष्यात आलेल्याअनुभवांना कल्पनाशक्तीची जोड देऊन एखादी कथा, कविता किंवा कादंबरी रचणंआणि त्यातून वाचकांना एखादी वेगळी अनुभूती प्राप्त करून देणं हे जास्तआव्हानात्मक आहे. मी अनेक नवनवीन पुस्तकं वाचत असतो. आजच्या लेखकांकडे अशाप्रकारचं लेखन रचण्याची क्षमता निश्चितच आहे. अशा सर्जनशील लेखकांनाप्रोत्साहन द्यायला हवं, ज्यायोगे ते भविष्यातील मराठी साहित्यविश्व समृध्द करतील.

साहित्यिक संवेदनशील असतो. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे भविष्याचावेध घेत बघण्याची शक्ती त्याच्याकडे असते. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' हेवाक्य सर्वश्रुतच आहे. जेव्हा एखादा कवी, लेखक, साहित्यिक एखादी कृती करतोतेव्हा त्याच्या ह्या कृतीमागचा अर्थ समजून घेण्याची तयारी आपण दाखवायला हवी. त्याच्या उक्तीचा, कृतीचा आदर राखून प्रगल्भतेने समाजामध्ये त्यावरविचारमंथन व्हायला हवं. समाज प्रगतीपथावर असण्याची ती खूण असते. ह्यासंमेलनाच्या निमित्ताने अशा पद्धतीची दिशा निश्चितच मिळेल हा माझा विश्वास आहे.

डॉ. श्रीपाल सबनीसांच्या रूपाने समाजातील सर्व स्तरांचा अभ्यास असणारे, ज्ञानेश्वर ते आंबेडकर कालखंडातील सामाजिक परिस्थितीचे यथार्थ विवेचन करणारे, वाचकास अंतर्मुख करणारे तसेच संत साहित्यातील सेक्युलॅरिझम संकल्पनेची विस्तृत ओळख करून देणारे नेतृत्व साहित्य संमेलनास लाभले आहे.

सेक्युलॅरिझम हा शब्द सध्या सर्वाधिक चर्चिला जाणारा शब्द आहे. सेक्युलॅरिझम या शब्दाच्या अर्थात आणि व्याप्तीबाबत खूप काही छापून येत आहे. पण त्या खोलात मी जात नाही. सेक्युलॅरिझम अथवा सहिष्णूता दोन्ही शब्द उच्चारासाठी जसे अवघड तसे आचारासाठी ही कठीण होत असल्याचे मात्र जाणवते. ह्या सामाजिक समस्येचे स्वरूप तसे वैश्विक आहे. परंपरावादी विरूद्ध पुरोगामी असा लढा हा शतकानुशतके चालत आलेला आहे. पण महाराष्ट्र यातून सावरेल. महाराष्ट्राच्या मातीची मशागत संत-महात्म्यांच्या विचाराने, शिवरायांच्या सहिष्णू आचरणाने, शाहू-फुले-आंबेडकर आदी समाजधुरिणांच्या अविश्रांत कार्याने उत्तमप्रकारे झाली आहे. या मातीत भेदाभेदाचे तण अधून-मधून उगवले तरी वणवा पेटणार नाही, याची तुम्ही-आम्ही मात्र काळजी घेतली पाहिजे. कारण विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विशेषकरून संचार व दूरसंचार या माध्यमांच्या विस्ताराने संस्कृती आणि सभ्यता वेगाने बदलते आहे.

या बाबतीत ज्ञानदेवांनी अखिल प्राणीजातीसाठी मागीतलेले पसायदान सतत मार्गदर्शक राहिल. 

दुरितांचे तिमिर जावो I विश्व स्वधर्म सूर्ये पाहो I
जो जे वांछील तो तें लाहो I प्राणिजात II

मला वाटते या दोन ओळींत विश्वाच्या कल्याणाचे सार सामावले आहे. पसायदानापेक्षा मोठे तत्वज्ञान जगातील इतर साहित्यात क्वचितच सापडेल.

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या आपत्तीतील पीडितांना मदत करण्यासाठी सामाजिक जाणीवेतून स्वागताध्यक्ष व संमेलनाध्यक्ष पुढे आले यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो.खरं तर दुष्काळानं साहित्याला खूप काही दिलं. १६३० च्या महाभयंकर दुष्काळात शेजारच्या देहूतल्या तुकारामाचं कुटुंब देशोधडीला लागलं. दुष्काळातील हालअपेष्टा पाहून, सहन करून विरक्त झालेल्या तुकारामांच्या मुखातून अभंगरूपी वेदना बाहेर पडू लागल्या. 

' बरे झाले देवा, निघाले दिवाळे l
बरी या दुष्काळे, पीडा केली II
अनुतापे तुझे, राहिले चिंतन I
जाला हा वमन,संवसार II

दुष्काळाने संत तुकारामांच्या माध्यमातून अभंगगाथेचं भांडार साहित्यजगतासमोर आलं. कालांतराने महात्मा जोतिबा फुलेंची लेखणी ही दुष्काळात आसूड बनून प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार करू लागली. १८९० च्या दुष्काळानं शेतकरी कुटुंबाची हृदयद्रावक व्यथा मांडणारा ह.ना.आपटें सारखा कथाकार आपणाला मिळाला. आता वेळ आली आहे की, कला-साहित्यजगताने दुष्काळ निवारणासाठी काही तरी करण्याची.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोहोंनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशन स्थापून एक नवा आदर्श घालून दिला आहे. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यंदाचा भीषण दुष्काळ पाहून सारस्वतांच्या सामाजिक संवेदना अधिक प्रखर झाल्या आहेत. साहित्य संमेलनातून जमा होणारा सर्व 'निधी नाम फाऊंडेशन'ला देण्याचा संयोजकांचा निर्णय हा एक नवा सामाजिक पायंडा पाडणारा आहे. त्याचे मी स्वागत करतो. लेखणीच्या अंगी बळीराजासाठी झटण्याचं बळ आलं याचं मला मनापासून समाधान आहे.
महानुभाव पंथ,वारकरी संप्रदाय आदींनी मराठी साहित्याचा पाया रचला त्या मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.संमेलनाचे औचित्य साधून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व संशोधनासाठी मराठीचे अध्यासन निर्माण केले याचे मी मनापासून कौतुक करतो.


या सोहळ्यासाठी वाचकांची,अभ्यासकांची, साहित्यिकांची जमलेली अलोट गर्दी पाहता हे संमेलन अविस्मरणीय ठरेल याचा मला विश्वास वाटतो. मागीलवर्ष सरता-सरता सर्व पिढींचे लाडके चिरतरुण कविवर्य मंगेश पाडगावकरांचे निधन मनाला चटका लावून गेले.तसेच नामदेव ढसाळ, प्रा. म. द. हातकणंगलेकर, चंद्रकांत खोत या ज्येष्ठ साहित्यिकांचे निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना करतो आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक, साहित्यिक आणि वाचक रसिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

संबंधित लेख