राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा

07 Feb 2018 , 09:04:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, सध्या राज्याच्या राजकारणात जे चित्र भाजप आणि शिवसेनेने निर्माण केलं आहे त्याच्या विरोधात एकत्र येऊन काम करण्यात यावे याची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच कॉंग्रेस अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीबद्दल माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक पार पडेल. त्यात आगामी अर्थसंकल्पाबाबत रणनिती ठरवली जाईल. दोन्ही पक्षात जी कटुता निर्माण झाली होती, ती कधीच दूर झाली असून दोन्ही पक्षांत गोडवा निर्माण झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख