तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी पर्यटनमंत्री जयकुमार रावलांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा - नवाब मलिक

09 Feb 2018 , 12:39:41 AM

- काळया यादीतील दोन कंपन्या जयकुमार रावल यांच्या...

- फसवणूक केल्याप्रकरणी रावल यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार...

नोटबंदीच्या काळात मोदी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख काळया यादीतील कंपन्यांमधील दोन कंपन्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या असून त्यापैकी तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. कंपनी एम.टी.डी.सी.च्या जागेवर आजही बेकायदा सुरु असून याप्रकरणाचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना देत आहोत त्यामुळे पर्यटनमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

१९९१ सालीमध्ये एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल रिसॉर्टने तोरणमाळ हिल भाडयाने घेतले. त्यानंतर १९९६ मध्ये ५ वर्षासाठी करार करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा २००१ ते २००६ पर्यंत १० वर्षासाठी हे रिसोर्ट भाडेकराराने घेण्यात आले, परंतु त्याचे भाडे भरण्यात आलेले नाही. उलट कंपनीने एमटीडीसीकडे ६० लाख खर्च झाल्याची मागणी केली. त्यानंतर एमटीडीसीने २०११ मध्ये सक्षम अधिकाऱ्यामार्फत भाडे भरा नाहीतर जागा खाली करा अशी नोटीस पाठवली, परंतु हे सांगण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट ही कंपनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

आम्ही या कंपनीचा शोध घेतला असता त्यावर ही माहिती उपलब्ध झाली आहे. नोटबंदीच्या काळामध्ये आरोसीने जाहीर केलेल्या काळया यादीतही तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा.कंपनी आणि डेव्हलपर्स या दोन कंपन्यांचा समावेश आहे. २७ जून २०१७ ला डी रजिस्टर करण्यात आले. तोरणमाळ गावातील सातबारामध्ये जयकुमार रावल यांचे नाव आहे. याबरोबरच जयकुमार रावल हे www.zaubacorp.com या वेबसाईटवरील माहितीनुसार दहा कंपन्यांचे चेअरमन आहेत असे दिसत आहे. या मंत्र्याचे ४ डीन नंबर आहेत. हे रिसॉर्ट कार्यरत आहे की नाही याची माहिती घेतली असता आज तोरणमाळ हिल रिसॉर्टमध्ये प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ७ हजार रुपये भरुन ऑनलाईन बुकींग केले त्यावेळी हे रिसॉर्ट सुरु असल्याचे समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्याचा एक पर्यटनमंत्री आपल्याच विभागाच्या एमटीडीसीचा रिसॉर्ट काबीज करतात. त्यामध्ये दारुचाही व्यवसाय करतात. रिसॉर्ट बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवतात, चेअरमन म्हणून काम करतात, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा. परंतु मुख्यमंत्री राजीनामा घेणार नाहीत. जयकुमार रावल यांची ते पाठराखण करत असून आम्ही जयकुमार रावल यांच्या कारनाम्याची कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवत असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली.

मोदी सांगत आहेत आम्ही खोदकाम सुरु केले आहे परंतु त्यांचे काम आम्ही कमी करत आहोत. आम्ही खोदकाम सुरु केलेल्यांवर कारवाई कधी करता आणि हे प्रकरण ईडीकडे कधी पाठवणार असा सवाल नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

२२ जानेवारीला शेतकरी धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांचे २८ जानेवारीला मृत्यू झाला. २९ जानेवारीला पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून करोडो रुपये कमवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवाब मलिक माझी बदनामी करत असल्याचे सांगत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार होते. त्यांनी धर्मा पाटील यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर माझ्याविरोधात धुळे पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु अदयाप मला कोणताही समन्स आलेला नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तोरणमाळ ही कंपनी डी रजिस्टर केलेली असतानाही कंपनीचा व्यवसाय सुरु आहे. हा फसवणूकीचा प्रकार असून त्याविरुध्द आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहोत. पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी जयकुमार रावल यांच्याविरोधातील संपूर्ण कागदपत्रे पत्रकारांना सुपूर्द केली.

या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या बीफ प्रश्नावर बोलताना नवाब मलिक यांनी जयकुमार रावल यांची आई नगराध्यक्षा असताना त्यांच्या वडिलांनी कार्यकर्त्यांमार्फत कत्तलखान्याचा प्रस्ताव आणला होता. तो कत्तलखाना आजही नगरपरिषदेच्या ताब्यात आहे आणि रावल यांची आई नगराध्यक्षा. राज्यात बीफ बंदी असतानाही मंत्री महोदय परदेशात बीफ निर्यात करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी नवाब मलिक यांनी केला.

यावेळी कृषिमंत्री बेपत्ता आहेत,कृषीमंत्री शोधा आणि हजार रुपये मिळवा असे अभियान आता राबवावे लागेल.शेतकऱ्यांचा संप झाला कृषीमंत्री दिसले नाहीत,कर्जमाफी,बोंडअळी,धर्मा पाटील आत्महत्या झाली कोणत्याहीवेळी कृषीमंत्री दिसले नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. या पत्रकार परिषदेला प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.

संबंधित लेख